फसवून अर्ज घेतला माघारी?
By Admin | Updated: February 8, 2017 03:03 IST2017-02-08T03:03:05+5:302017-02-08T03:03:05+5:30
उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने चिंचवडमधील ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक कार्यालयात गर्दी झाली होती

फसवून अर्ज घेतला माघारी?
चिंचवड : उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने चिंचवडमधील ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक कार्यालयात गर्दी झाली होती. शेवटच्या क्षणात प्रभाग क्रमांक १९ मधील एका महिला उमेदवाराने अर्ज माघारीसाठी धावपळ करीत अर्ज मागे घेतला; मात्र काही वेळानंतर आपल्याला फसवून अर्ज मागे घेतल्याची आरडाओरड सुरू केल्याने कार्यालया बाहेर गोंधळ सुरू झाला.
दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत होती. अर्धा तास बाकी असताना निवडणूक कार्यालयातून या बाबत सूचना देण्यात येत होत्या. वेळ संपण्यासाठी पाच मिनिटे बाकी असताना निवडणूक निर्णय अधिकारी रूपाली आवले यांनी कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर कोणी अर्ज माघार घेण्यासाठी येत असतील, तर आत यावे अशा सूचना दिल्या. या वेळी काही उमेदवार व कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित होते. अधिकारी पुन्हा कार्यालयात जाताच एक कार्यकर्ता व महिला उमेदवार अधिकाऱ्याच्या दालनात गेले व उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून बाहेर आले.
यानंतर कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. मात्र काही वेळातच या महिला उमेदवाराचे काही कार्यकर्ते व महिला समर्थक कार्यालया बाहेर जमा झाले. या वेळी या महिला उमेदवाराने आपल्याला फसवून आणल्याचे सांगत गोंधळ सुरु केला.
मी घरात जेवत असताना माझा अर्ज बाद होणार असल्याने, मला त्वरित कार्यालयात बोलाविले असल्याचे एका व्यक्तीने सांगितले. तुमचे पती कार्यालयात बसले आहेत. तुम्ही लवकर चला, असे सांगून मला कार्यालयात सही करण्यासाठी घेऊन आल्याचा कांगावा केला. यामुळे काही काळ कार्यालयाबाहेर गोंधळ सुरु होता. माझी फसवणूक केल्याचे ही उमेदवार सांगत होती.(वार्ताहर)