स.प. महाविद्यालयाला दणका
By Admin | Updated: February 23, 2015 00:49 IST2015-02-23T00:49:44+5:302015-02-23T00:49:44+5:30
अकरावी प्रवेशाचा गोंधळ, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेच्या वाटपात झालेला गैरव्यवहार अशा कारणांमुळे चर्चेत असलेल्या स. प.

स.प. महाविद्यालयाला दणका
पुणे: अकरावी प्रवेशाचा गोंधळ, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेच्या वाटपात झालेला गैरव्यवहार अशा कारणांमुळे चर्चेत असलेल्या स. प. महाविद्यालयाने अर्थशास्त्र विषय शिकविणाऱ्या प्राध्यापकाची महाविद्यालयामध्ये बेकायदा नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संबंधित प्राध्यापकाची मान्यता रद्द करण्याचे आदेश देऊन महाविद्यालयाला आणखी एक दणका दिला आहे.
स. प. महाविद्यालयात प्रा. सुनील शिंदे यांची तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, महाविद्यालय प्रशासनाने या प्राध्यापकाची नियुक्ती पूर्णवेळ असल्याचा अहवाल विद्यापीठाला सादर केला. त्याचप्रमाणे त्यासाठी लागणारी बनावट कागदपत्रे तयार केली. परंतु, यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक- शिक्षकेतर संघटनेतर्फे विद्यापीठाकडे तक्रार देण्यात आली. तक्रारीनुसार विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या एका सदस्याची समिती स्थापन केली. समितीने सर्व बाबी तपासून सुनील शिंदे यांची २००३-२००४ ते २०१० - २०११ पर्यंतची पूर्णवेळ व्याख्याता पदाची मान्यता रद्द करण्याची शिफारस केली आहे. शिंदे पूर्णवेळ व्याख्याता नसताना त्यांना विद्यापीठाकडून मान्यतापत्रे कशी देण्यात आली, असा सवालही या समितीने उपस्थित केला आहे. शैक्षणिक संस्थेतर्फे हेतुपुरस्सर सोयीच्या तारखा दाखवून कामावर रुजू होण्यासंदर्भातील बेकायदेशीर अहवाल तयार केला होता.