महापालिकेला खेचले न्यायालयात
By Admin | Updated: December 16, 2014 04:22 IST2014-12-16T04:22:04+5:302014-12-16T04:22:04+5:30
महापालिकेने विविध सेवांचे खासगीकरण केले आहे. आरोग्य विभागात साफसफाई कामापासून ते अन्य विभागातील कामे कंत्राटी पद्धतीने दिलेली आहेत

महापालिकेला खेचले न्यायालयात
पिंपरी : महापालिकेने विविध सेवांचे खासगीकरण केले आहे. आरोग्य विभागात साफसफाई कामापासून ते अन्य विभागातील कामे कंत्राटी पद्धतीने दिलेली आहेत. त्या ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम वेळचेवेळी जमा केली जात नाही. या संदर्भात भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने महापालिका प्रशासनाला वेळोवेळी कळविले होते. २०११ पासून अशा कर्मचाऱ्यांपैकी एकाही कर्मचाऱ्याचा भविष्यनिर्वाहीनिधी जमा केलेला नाही. महापालिकेने याबाबत हलगर्जीपणा दाखविल्याने भविष्य निर्वाहनिधी कार्यालयाने न्यायालयात खटला दाखल केला आहे.
महापालिका प्रशासनाने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून होणाऱ्या पत्रव्यवहाराकडे दुर्लक्ष केले. त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. भविष्य निर्वाह निधीसाठी महापालिकेच्या बँक खात्यांची माहिती मागवली आहे. त्याचप्रमाणे या खटल्याबाबत होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा न केल्यास महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई सुरू करण्यात येईल. अशी समजही देण्यात आली आहे.
कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा न केल्यास संबंधित ठेकेदारांना बिले देताना हा निधी ठेकेदारांच्या बीलातून कपात करून वसूल करण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. मात्र महापालिकेनेही अधिकाराचा वापर केलेला नाही. ही चूक महापालिकेला भोवली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागात सफाई काम करण्यासाठी, तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह, रूग्णालये आणि नालेसफाईसाठी महापालिकेने खासगी संस्थांना कामे दिली आहेत. त्यामध्ये बेरोजगारांच्या स्वयंरोजगार सेवा संस्थांचाही
समावेश आहे. (प्रतिनिधी)