कर्तव्यावरील अधिकारी दाम्पत्याने केले ‘गणेगाव खालसा’ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:08 IST2021-06-11T04:08:32+5:302021-06-11T04:08:32+5:30
दोन महिन्यांत एकही मृत्यू नाही : दुसऱ्या लाटेत गणेगाव खालसा गाव कोरोनापासून दूर अभिजित कोळपे पुणे : गावातील कोरोनाबाधित ...

कर्तव्यावरील अधिकारी दाम्पत्याने केले ‘गणेगाव खालसा’ कोरोनामुक्त
दोन महिन्यांत एकही मृत्यू नाही : दुसऱ्या लाटेत गणेगाव खालसा गाव कोरोनापासून दूर
अभिजित कोळपे
पुणे : गावातील कोरोनाबाधित शोधणे, विलगीकरण करणे आणि तत्काळ उपचार सुरू करणे या त्रिसूत्रीच्या जोरावर शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा गाव कोरोनामुक्त झाले आहे. यासाठी सध्या नाशिकमध्ये पोलीस उपायुक्त असणारे अमोल श्रीधर तांबे आणि नाशिक महापालिकेतील उपायुक्त अर्चना अमोल तांबे या अधिकारी दाम्पत्याने कर्तव्यावर असतानाच आपले मूळगावही कोरोनामुक्त केले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोविड सेंटर उभारून बाधितांवर तत्काळ उपचार केले. त्यामुळे दोन हजार लोकसंख्येच्या गावात गेल्या दोन महिन्यांत गावात एकही नवा कोरोनाबाधित अथवा एकही मृत्यू झाला नाही.
तांबे दाम्पत्य हे मूळचे गणेगाव खालसा गावचे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भीतीचे वातावरण होते. गावकरी गंभीर आजार अंगावर काढू लागले. कोणाला कोरोना झाला, तरी उपचारासाठी शिक्रापूर अथवा पुण्याला जायला धजावत नव्हते. त्यामुळे तांबे दाम्पत्याने पुढाकार घेऊन उपसरपंच आबा बांगर, सदस्य अभिजित तांबे, माजी सरपंच दत्ता पिंगळे यांच्या मदतीने गावातच कोविड सेंटर उभारले. घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करून बाधित रुग्णांना कोविड सेंटरमध्ये तत्काळ दाखल करून उपचार सुरू केले
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोरोनाबाधित रुग्ण शोधणे, त्यांचे विलगीकरण करणे त्यांच्यावर वेळेत उपचार करणे आणि हे सर्व आपल्या गावातच करणे, जेणेकरून मनातील भीती दूर होईल यासाठी ग्रामपंचायतीच्या मदतीने गावातच कोविड सेंटर सुरू केले. याकामी अनेक मित्र, सहकारी, ग्रामस्थ, संस्था यांची मदत पुढे आली आणि दोन महिन्यांच्या कालावधीत ११० पेक्षा जास्त टेस्ट, ३० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, त्यातील २४ जणांना तत्काळ दाखल केले. तसेच इतर ५५ जणांना बाह्यरुग्ण (ओपीडी) उपचार दिले. दोन महिन्यांत गावात नवीन एकही रुग्ण आढळला नसल्याने हे सेंटर तूर्तास बंद करण्यात आले.
कोट
“नाशिकमध्ये कर्तव्य बजावतच गावाला सातत्याने मार्गदर्शन केले. मूलभूत गरजा सोडवल्या. ग्रामपंचायतीच्या मदतीने कोविड सेंटरची उभारणी केली. तेथे दोन डॉक्टर, दोन नर्स, कंपाऊंडरची नियुक्ती केली. आणीबाणी उद्भवल्यास रुग्णवाहिकेची २४ तास व्यवस्था केली. शिक्रापूर येथील डॉ. अविनाश रोखे यांनी सातत्याने मार्गदर्शन केले. त्यामुळे गाव कोरोनामुक्त करण्यास मदत झाली.”
- अमोल तांबे, पोलीस उपायुक्त, नाशिक (मूळ गणेगाव खालसा)
----------
कोट
“संकटे येत राहतील. पण आपण सर्वजण एक आहोत, हे या काळात कृतीतून दिसणे फार महत्त्वाचे होते. त्यासाठी सर्वांनी एकमेकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला. असे प्रत्येक गावाने पुढाकार घेतल्यास आपण निश्चितच गाव कोरोनापासून दूर ठेवू.”
- अर्चना तांबे, उपायुक्त, नाशिक महापालिका (मूळ गणेगाव खालसा)
फोटो : १) अमोल तांबे आणि अर्चना तांबे
२) रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक.
३) गणेगाव खालसा गावात उभारलेले कोविड सेंटर.