पुणे: डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेदरम्यान दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणी राज्यभरात खळबळ उडाली होती. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आरोग्य विभागाने ८ सदस्यीय तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती नेमली. निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, यासाठी राज्याबाहेरील व राज्यातील तज्ज्ञांचा या समितीत समावेश होता. या समितीने तब्बल सव्वा महिन्याच्या कालावधीनंतर अहवाल आरोग्य विभाकडे सुपूर्द केला. त्यालाही २० दिवसांहून अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, अहवालाच्या आधारे वैद्यकीय निष्काळजी झाली की नाही? अथवा दोषारोप निश्चत करण्याबाबत आरोग्य विभागाकडून अद्याप कोणत्याच हालचाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत चौकशी केली असता, आरोग्य विभागातील अधिकारीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अंगुलीनिर्देश करत आहेत. याबाबत आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यास प्रत्युत्तर मिळाले नाही.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या चौकशी समितीने यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसंदर्भातील सर्व कागदपत्रे आणि सह्याद्री रुग्णालयाने सादर केलेली उपचारपत्रके, शस्त्रक्रियेची कागदपत्रे व शवविच्छेदन अहवाल तपासणार होती. त्यानंतर शस्त्रक्रियेदरम्यान दाम्पत्याच्या मृत्यूंना सह्याद्री रुग्णालय व्यवस्थापन व डॉक्टर्स जबाबदार आहे की नाही? यावर समिती अंतिम निर्णय देणार होती. मात्र, समितीने कोणताही निर्णय न देता चौकशी अहवाल आरोग्य विभागाकडे दिला आहे. या समितीत चेन्नईचे नामवंत यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. मोहम्मद रेला, केईएम मुंबईचे डॉ. राम प्रभू, अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. राहुल पंडित, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. वसंत नागवेकर, डॉ. विजय व्होरा, डॉ. आकाश शुक्ला, ससून रुग्णालयाचे डॉ. पद्मसिंह रणबागळे आणि आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांचा समावेश आहे.
नेमके प्रकरण काय?
दि. १३ ऑगस्ट रोजी बापू कोमकर यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी त्यांच्या पत्नी कमिनी कोमकर यांनी स्वत:च्या यकृताचा एक भाग दान केला होता. मात्र, शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन दिवसांत म्हणजे १५ ऑगस्ट रोजी बापू कोमकर यांचा मृत्यू झाला, तर आठवड्यानंतर २२ ऑगस्ट रोजी कमिनी यांचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबीयांनी वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप सह्याद्री रुग्णालयावर केला आहे. दरम्यान, मृत महिलांच्या नातेवाइकांनी डेक्कन पोलिस ठाण्यात वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणानंतर आरोग्य विभागाने सह्याद्री रुग्णालय प्रशासनाला नोटीस पाठवून चौकशी पूर्ण होईपर्यंत येथील यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना तात्पुरती स्थगिती दिली आहे.
सह्याद्री रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान दाम्पत्याच्या मृत्यूच्या घटनेबाबत सखोल व निष्पक्ष चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने अहवाल शासनाकडे पाठविला आहे. तज्ज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे शासनाकडून पुढील कार्यवाही केली जाईल. - डॉ. भगवान पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ.
Web Summary : Sahyadri Hospital's liver transplant deaths spark investigation. Report submitted, but action delayed, fueling negligence concerns. Kin allege medical lapses. Probe underway.
Web Summary : सह्याद्री अस्पताल में लिवर ट्रांसप्लांट से हुई मौतों की जांच जारी है। रिपोर्ट सौंपी गई, लेकिन कार्रवाई में देरी से लापरवाही की आशंका बढ़ रही है। परिजनों ने चिकित्सा त्रुटियों का आरोप लगाया। जांच जारी है।