देशात सप्टेंबरमध्ये ११० टक्के पावसाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:25+5:302021-09-02T04:25:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देशभरात सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या ११० टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...

देशात सप्टेंबरमध्ये ११० टक्के पावसाचा अंदाज
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशभरात सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या ११० टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असून उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही भागात सरासरीइतका तर, काही भागात कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
देशभरात सप्टेंबरमध्ये सरासरी १७० मिमी पावसाची नोंद होती. त्यापेक्षा यंदा अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर जून ते सप्टेंबरअखेर देशभर पाऊस जेमतेम सरासरी गाठण्याची शक्यता असल्याचा नवा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे.
देशभरात जून ते ऑगस्टदरम्यान सरासरीपेक्षा ९ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीपेक्षा ३ टक्के अधिक पाऊस नोंदविला गेला आहे. कोकण १२ टक्के, मध्य महाराष्ट्र ५ टक्के आणि मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या २० टक्के अधिक पाऊस झाला आहे. विदर्भात आतापर्यंत १४ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
सप्टेंबरमध्ये देशातील मध्य भारतातील अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पश्चिम किनारपट्टीवर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून दक्षिण भारतातील जवळपास सर्व राज्ये, राजस्थान, ईशान्य भारत, पंजाब, उत्तराखंड भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यात मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक किंवा सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागात तो सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरी पाऊस झाला असून सप्टेंबरमध्ये अधिक पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कमी पाऊस झाला आहे. सप्टेंबरमध्ये या भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विदर्भातील ११ जिल्ह्यापैकी केवळ यवतमाळ व वाशिममध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सप्टेंबरमध्ये ही कमतरता भरून निघण्याची शक्यता आहे.
जून ते ऑगस्टअखेर
कोकण - १२ टक्के अधिक
मध्य महाराष्ट्र - ५ टक्के अधिक
मराठवाडा - २० टक्के अधिक
विदर्भ - - १४ टक्के कमी
संपूर्ण महाराष्ट्र ३ टक्के अधिक