जाळीच्या पिंजऱ्यात होणार मतमोजणी
By Admin | Updated: February 23, 2017 03:37 IST2017-02-23T03:37:21+5:302017-02-23T03:37:21+5:30
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या १८, १९ व २० या प्रभागांची मतमोजणी बंडगार्डन

जाळीच्या पिंजऱ्यात होणार मतमोजणी
पुणे : भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या १८, १९ व २० या प्रभागांची मतमोजणी बंडगार्डन येथील मौलाना अबुल कलाम सभागृहात गुरुवारी सकाळी १० वाजता सुरू होणार
आहे.
लोखंडी जाळीच्या पिंजऱ्याच्या आत मतमोजणी होणार असून, जाळीच्या बाहेर उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी असतील. पहिल्या एका प्रभागाची संपूर्ण मतमोजणी होण्यास चार तास लागतील, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यानंतर वेग वाढेल, अशी माहिती देण्यात आली. सभागृहाच्या आत व बाहेरही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रभागांपासून दूरवरच्या सभागृहात मतमोजणी ठेवण्यात आल्याने काही उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र भवानी पेठ किंवा लोहियानगर अशा मध्यभागातील ठिकाणी योग्य जागा नसल्यामुळे मतमोजणी दूरवर ठेवावी लागली, असे सांगून निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी त्यांची नाराजी दूर केली आहे. सुरुवातीला प्रभाग क्रमांक २० ची मतमोजणी होईल. त्यानंतर १९ व प्रभाग क्रमांक १८ याप्रकारे मतमोजणी होईल.
सर्व टेबलवर मिळून एकूण ४५ कर्मचारी असतील. त्यातील एक मतमोजणी अधिकारी, दुसरा व तिसरा सहायक असेल. याशिवाय काही कर्मचारी राखीव असून, एकूण कर्मचारी संख्या १५० आहे. कंट्रोल युनिटमधून मतमोजणी केली जाईल. उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना कंट्रोल युनिट दाखवून नंतर त्या उमेदवाराला पडलेल्या मतांची नोंदणी होईल. याच प्रकारे प्रत्येक प्रभागाची मतमोजणी होईल. पहिले दोन प्रभाग तुलनेने लवकर होतील.
प्रभाग क्रमांक १८ मध्ये मात्र सर्व गटांचे मिळून ५१ उमेदवार आहेत. त्यामुळे या गटाची मोजणी होण्यास तुलनेने वेळ लागणार आहे. (प्रतिनिधी)