पानविक्रेत्यांना पालिकेच्या नावाने बनावट नोटिसा
By Admin | Updated: September 24, 2014 05:50 IST2014-09-24T05:50:47+5:302014-09-24T05:50:47+5:30
शहरातील पान स्टॉलधारकांना महापालिकेच्या नावाने बनावट नोटिसा देऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली

पानविक्रेत्यांना पालिकेच्या नावाने बनावट नोटिसा
पुणे : शहरातील पान स्टॉलधारकांना महापालिकेच्या नावाने बनावट नोटिसा देऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या बनावट नोटिसांबाबत संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या वतीने पोलिसांत तक्रार दिली आहे.
मूळ किमतीपेक्षा अधिक किमतीने मालाची विक्री करीत असल्याच्या तक्रारीच्या कारणासाठी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा नोटिसा पान स्टॉल धारकांना दिल्या जात आहेत. या नोटिसांवर मनपाचे बोधचिन्ह व सील वापरण्यात आले आहे. त्यामुळे पान असोसिएशनने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे तक्रार केली आहे. अशाप्रकारे शहरात २८० पान व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. संबंंधित नोटिसांमध्ये नमूद केलेला जावक क्रमांक परवाना व आकाशचिन्ह विभागाकडील नसून, त्यावरील स्वाक्षरीही विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याची नाही. अशा नोटिसा देण्याचे अधिकार पालिकेला नाहीत. त्यामुळे पालिकेने नोटिसा देण्याचा प्रश्नच येत नाही. या बनावट नोटिसांविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आल्याचे पालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)