मतमोजणी संथ गतीने
By Admin | Updated: April 5, 2015 00:53 IST2015-04-05T00:53:29+5:302015-04-05T00:53:29+5:30
श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया कासवगतीने सुरू राहिल्याने एकेका मतदारसंघाचे निकाल हाती येण्याची वाट पाहण्याची वेळ सर्वांवरच आली.

मतमोजणी संथ गतीने
पिंपरी : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया कासवगतीने सुरू राहिल्याने एकेका मतदारसंघाचे निकाल हाती येण्याची वाट पाहण्याची वेळ सर्वांवरच आली. त्यामुळे आपले राजकीय भवितव्य काय राहणार, याची उकल होण्यासाठी भावी कारभाऱ्यांना शनिवारी रात्री उशिरापर्यंत ताटकळत बसण्याची वेळ आली.
कारखान्याच्या २१ जागांसाठी गुरुवारी झालेल्या मतदानाची मोजणी शनिवारी मुळशी तालुक्यातील कासारआंबोली गावातील मुलींच्या सैनिकी शाळेतील सभागृहात झाली. त्यासाठी निवडणूक विभागाने ३२ टेबलवर मोजणीची व्यवस्था केली. सकाळी ८पासूनच मतमोजणीला सुरुवात होणार होती. त्या कामी दीडशे कर्मचारी साडेसहापासूनच हजर राहिले. सकाळी सात वाजल्यापासून उमेदवारांचे मतदार प्रतिनिधी आणि समर्थक मतदान केंद्रावर, तसेच केंद्राबाहेर मोठ्या संख्येने जमले होते.
प्रत्यक्षात मतमोजणी सुरू होण्यास अडीच तास उशीर होत, ती सकाळी साडेदहाला सुरू झाली. पहिल्या फेरीमध्ये २१ टेबलवरील, त्यामध्ये मावळ, मुळशी तालुक्यातील मतमोजणीला सुरुवात झाली. एकेक मतपत्रिका काढून त्यामधील मताची नोंद केली जात होती. या वेळी आतमध्ये उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी एकेका मतदानावर बारकाईने लक्ष देत होते. दुपारी साडेबारानंतर एकेका मतदारसंघातील व गटातील मतमोजणी मुख्य निवडणूक अधिकारी सुभाष बोरकर यांनी ध्वनिक्षेपकावर जाहीर करण्यास सुरुवात केली. या वेळी प्रशांत ढगे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित होते.
मुख्य फाटकावरच प्रत्येकाची कसून चौकशी केली गेली. ज्यांचा या प्रक्रियेशी थेट संबंध नाही, अशांना तेथेच रोखण्यात आले. मतमोजणी स्थळीही उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांची लुडबूड होणार नाही, याची खबरदारी घेत पोलिसांची करडी नजर बंदोबस्तावर राहिली. अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)
समर्थक पोळले उन्हात
४मतदान केंद्राबाहेर अनेक समर्थकांना पाचशे मीटरवर असलेल्या फाटकावरच रोखण्यात आले होते. जवळ फारशी झाडे व बांधकामे नसल्याने त्यांना बसण्यासाठी सावलीअभावी उन्हातच ताटकळत थांबण्याची वेळ आली. त्यामुळे समर्थक कार्यकर्तेही नाराज झाले.
४एकीकडे मतदारांचे प्रमाण व उमेदवारांची संख्या अधिक असताना मतपत्रिका मोजण्यास किती वेळ लागेल, याचा अंदाज लांबत चालल्याचे दिसून आले. कामाच्या व्यापामुळे अनेक निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना जेवण करण्यासही फुरसत मिळाली नाही. बहुतेक जणांचे काम उपाशीपोटीच सायंकाळी सातपर्यंत सुरू होते. रात्री उशिरापर्यंत केवळ पाणी पिऊन जबाबदारी पार पाडण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आल्याचे दिसून आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. नियोजन नसल्याबद्दल काहीजणांनी नाराजी व्यक्त केली.