वाहतूक पोलिसांकडून वळसेंसाठी ‘कॉरिडॉर’
By Admin | Updated: December 14, 2015 00:28 IST2015-12-14T00:28:54+5:302015-12-14T00:28:54+5:30
कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांना तातडीने नगर रस्त्यावरच्या एका खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘कॉरिडॉर’ तयार केला

वाहतूक पोलिसांकडून वळसेंसाठी ‘कॉरिडॉर’
पुणे : कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांना तातडीने नगर रस्त्यावरच्या एका खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘कॉरिडॉर’ तयार केला. भारती हॉस्पिटलपासून रुबी हॉस्पिटलपर्यंतचे अंतर अवघ्या १४ मिनिटात गाठणे शक्य झाल्यामुळे त्यांना वेळेत उपचारही मिळू शकले.
पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, वळसे पाटलांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार होते. त्यासाठी वाहतूक शाखेच्या सर्व अधिकाऱ्यांना रस्त्यावर येण्याचे आदेश देण्यात आले. कात्रजच्या भारती हॉस्पिटलपासून रुग्णवाहिकेमधून त्यांना सातारा रस्ता, मार्केट यार्ड, वखार महामंडळ, सेव्हन लव्हज चौक, रास्ता पेठ, समर्थ पोलीस ठाणे मार्गे, पोलीस आयुक्तालयावरून जहांगिर हॉस्पिटल, रुबी हॉल रुग्णालयात नेण्यात आले. या मार्गावरील सर्व वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. रुग्णवाहिका पुढे गेल्यानंतर पाठीमागील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अवघ्या १४ मिनिटांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमुळे ही रुग्णवाहिका रुग्णालयात पोचली. पुणेकर वाहनचालकांनी केलेल्या सहकार्याबाबत आवाड यांनी त्यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)