भरपाई नक्की मागायची कोणाकडे?
By Admin | Updated: February 24, 2015 00:22 IST2015-02-24T00:22:41+5:302015-02-24T00:22:41+5:30
कोरेगाव भीमा व डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे रविवारी वीजवाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे उसाला लागलेल्या आगीमध्ये

भरपाई नक्की मागायची कोणाकडे?
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा व डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे रविवारी वीजवाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे उसाला लागलेल्या आगीमध्ये १६ शेतकऱ्यांचे ४२ एकरपेक्षा अधिक क्षेत्राचे सुमारे २५ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. उसाला आग उच्चदाब क्षमतेच्या वाहिनीमुळे लागली की कमी दाब क्षमतेच्या वाहिन्यांमुळे असे प्रश्न उपस्थित करून महावितरण व महापारेषण जबबादारी एकमेकांवर टाकत आहेत. त्यामुळे भरपाई नक्की कोणाकडे मागायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
जळीत उसाची साखर कारखान्यांनी त्वरित तोडणी करण्याची व जळीत उसाच्या बिलामध्ये कोणतीच कपात करू नये, अशी मागणी मधुकर गव्हाणे यांनी केली आहे . आग नक्की कशामुळे लागली, याचा अहवाल दोन-तीन दिवसांत वरिष्ठ कार्यालयास सादर करणार असल्याचे विद्युत निरीक्षक एम. एस. जगताप यांनी सांगितले.
नुकसानीचा पंचनामा कोरेगाव भीमाचे मंडल अधिकारी राजेंद्र गायकवाड व कृषी सहायक श्रीमती आरती कारंडे यांनी केला.
महावितरणने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले; तर आग उच्च दाब क्षमतेच्या
वाहिनीमुळे लागली की कमी दाब क्षमतेच्या वाहिन्यांमुळे लागली, याबाबत हे दोन्ही विभाग एकमेकांवर टोलवाटोलवी करण्यापेक्षा त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, अशा सूचना केल्याचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले.
जळालेल्या उसाची त्वरित तोडणी करण्यासाठी कारखान्यामार्फत हार्वेस्टर मशिनची तत्काळ उपलब्धता करून सर्व बाधित शेतकऱ्यांचा ऊस दोन-तीन दिवसांत नेण्यासाठी प्रयत्न करतानाच वीज कंपनीनेही त्वरित कार्यवाही करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी माजी आमदार व घोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष अॅड. अशोक पवार यांनी सांगितले. (वार्ताहर)