नगरसेवकांनीच दाखविला ठेंगा
By Admin | Updated: March 18, 2015 00:39 IST2015-03-18T00:39:04+5:302015-03-18T00:39:04+5:30
अंदाजपत्रकात प्रत्येक प्रभागासाठी समान निधीचे वाटप झाले नसल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात असली, तरी या अंदाजपत्रकाच्या मान्यतेस पालिकेतील १५७ पैकी केवळ १६ सदस्य उपस्थित होते.

नगरसेवकांनीच दाखविला ठेंगा
पुणे : अंदाजपत्रकात प्रत्येक प्रभागासाठी समान निधीचे वाटप झाले नसल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात असली, तरी या अंदाजपत्रकाच्या मान्यतेस पालिकेतील १५७ पैकी केवळ १६ सदस्य उपस्थित होते. याच सदस्यांनी अंदाजपत्रकाबाबत आपली भूमिका सभागृहात मांडण्याची तसदी घेतल्याचे मंगळवारी दिसून आले.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णेगुरुजी यांनी मागील महिन्यात २७ फेब्रुवारीला २०१५-१६ चे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकात विरोधी पक्षांना निधी देताना आखडता हात घेतल्याने सेना, भाजप, तसेच मनसेच्या नगरसेवकांमध्ये नाराजी होती. तसेच राष्ट्रवादीसमवेत सत्तेत असलेल्या कॉँग्रेसच्या काही सदस्यांच्या तरतुदीलाही कात्री लावण्यात आली होती. त्यामुळे अंदाजपत्रकावरील चर्चा वादळी होण्याची शक्यता होती.
प्रत्यक्षात सकाळी ११ वाजता सभा सुरू झाल्यानंतर केवळ मोजकेच सदस्य होते. त्यानंतर सुमारे ४० ते ५० सदस्यांनी सभागृहात हजेरी लावली. ही सभा सुमारे साडेसात तास चालली. त्यात, कॉंग्रेसकडून विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांच्यासह उपमहापौर आबा बागूल यांनी भाषणे केली. तर, राष्ट्रवादीकडून बंडू केमसे, बाबूराव चांदेरे , मीनल सरवदे, सभागृहनेते सुभाष जगताप यांची भाषणे झाली. शिवसेनेकडून गटनेते अशोक हरणावळ, सोनम झेंडे, संगीता ठोसर यांनी भाषणे केली. तर, मनसेचे गटनेते बाबू वागसकर, वसंत मोरे, किशोर शिंदे, वनीता वागसकर, पुष्पा कनोजिया, अस्मिता शिंदे, रूपाली पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला, तर भाजपाकडून नगरसेविका मुक्ता टिळक, धनंजय जाधव, मंजूषा नागपूरे, माधुरीताई सहस्रबुद्धे यांनी अंदाजपत्रकावर मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
अंदाजपत्रकावरील चर्चा सुरू होताच काही मिनिटांतच सभागृह रिकामे होण्यास सुरूवात झाली. दुपारी जेवणानंतर सभागृहात अवघे २५ ते ३० नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर ही संख्या आणखी कमी झाली. अखेर साडेसहा तास चर्चा चालल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास अवघ्या १६ सदस्यांच्या उपस्थितीत अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. मात्र, प्रमुख नगरसेवक भाषणे करून निघून गेल्याने उपस्थित सदस्यांनी याबाबत महापौरांकडे नाराजी व्यक्त केली.