नगरसेविकेला गंडविणाऱ्यास अटक
By Admin | Updated: July 5, 2016 03:08 IST2016-07-05T03:08:08+5:302016-07-05T03:08:08+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता वाघेरे यांची ६३ लाख १० हजार १२१ रुपयांची फसवणूक करणाऱ्या खासगी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पिंपरी पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या.

नगरसेविकेला गंडविणाऱ्यास अटक
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता वाघेरे यांची ६३ लाख १० हजार १२१ रुपयांची फसवणूक करणाऱ्या खासगी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पिंपरी पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या. ही कारवाई संगमनेर येथे करण्यात आली. दीपक रमेश मोरे (वय ३४, रा. संगमनेर, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरवाडी चौकात एका खासगी विमा कंपनीचे कार्यालय आहे. तेथे मोरे हा कंपनीचा प्रतिनिधी म्हणून काम करत होता. वाघेरे यांनी या कंपनीत डिसेंबर २००९मध्ये पाच वर्षे कालावधीसाठी पॉलिसी काढली होती. तीन वर्षे त्यांनी नियमितपणे विम्याचे हप्ते भरले.
विमा कंपनीतील कर्मचारी आणि बँकेतील कर्मचाऱ्याने संगनमताने त्यांच्या नावाने बनावट बँक खाते उघडले होते. विमा पॉलिसीची बनावट कागदपत्रे तयार केली. सुमारे ६३ लाख १० हजार १२१ रुपयांचा अपहार केला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वाघेरे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संगमनेर येथे जाऊन मोरे याच्या मुसक्या आवळल्या.
(प्रतिनिधी)