महामंडळ महाकोशास रुपयाही देणार नाही

By Admin | Updated: March 11, 2017 03:35 IST2017-03-11T03:35:32+5:302017-03-11T03:35:32+5:30

संमेलनाध्यक्षपदाच्या १५ महिन्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर असे एकूण ३७९ सांस्कृतिक कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांचे मानधन म्हणून १२ लाखांची रक्कम

The corporation will not even give the rupee to the treasury | महामंडळ महाकोशास रुपयाही देणार नाही

महामंडळ महाकोशास रुपयाही देणार नाही

पुणे : संमेलनाध्यक्षपदाच्या १५ महिन्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर असे एकूण ३७९ सांस्कृतिक कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांचे मानधन म्हणून १२ लाखांची रक्कम मिळाली असली, तरी ती माझ्या भूमिकेनुसार, मानसिकतेनुसार आणि गरजेनुसार संस्था आणि व्यक्तींना मदत म्हणून ती देणार आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी निधीबाबत मध्यंतरी खडा मारून पाहिला होता; मात्र तुर्तास त्यातील एक रुपयाही महामंडळाच्या महाकोशासाठी देण्याचा विचार नाही, अशी स्पष्टोक्ती माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी दिली.
शासनाच्या मदतीशिवाय लोकसहभागाने मराठी साहित्य संमेलन पार पडावे, या उद्देशाने महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी मराठी साहित्यप्रेमींना महाकोशासाठी निधी देण्याचे वारंवार आवाहन केले आहे. साहित्यिकांनी या महाकोशासाठी दीडदमडीचा हातभार लावलेला नाही, असे विधान जोशी यांनी केले होते. याबाबत सध्या तरी निधीमध्ये भर घालणार नसल्याचे सबनीस यांनी सांगितले.
त्यांनी नांदेड येथील नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि भोपाळमधील मराठी परिषदेला प्रत्येकी ५ हजार रुपयांची देणगी दिली आहे. त्याचबरोबर इतर संस्थांना मदत केली जाणार असल्याचे सबनीस यांनी सांगितले आहे.
संमेलनाध्यक्ष असताना डॉ. श्रीपाल सबनीस यांना डॉ. पी. डी. पाटील यांच्याकडून ५ लाख आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून १ लाख रुपयांचा निधी मिळाला. या ६ लाख रुपयांचा अहवाल सबनीस यांनी परिषदेकडे सुपूर्त केला. त्यानिमित्त पत्रकारांशी बोलताना त्यांनी महामंडळाला मदत न करण्याबाबत भाष्य केले.
या वेळी डॉ. सबनीस यांच्यासह मसापच्या कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषणाचा इंग्रजी अनुवाद करणारे प्राचार्य अ. नि. माळी व अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

पी. डी. पाटील यांचा हिशेब मागणे चुकीचे
सध्याचे मुख्यमंत्री पारदर्शकतेवर जास्त भर देत आहेत. पारदर्शकतेशिवाय संस्था, व्यक्ती अथवा समाजाचा कारभार शुद्ध होऊ शकत नाही. मोजक्याच संमेलनाध्यक्षांनी निधीचा हिशेब सादर केला. समाजाचा पैैसा खर्च करीत असताना त्याचा हिशेब देणे, हे माझे नैतिक कर्तव्य आहे. परंतु, एखादी व्यक्ती स्वत:च्या खिशातील पैसा खर्च करीत असेल, तर त्या पैशांचा हिशेब मागणे चुकीचे आहे, असे सांगून सबनीस यांनी पी. डी. पाटील यांच्याकडे संमेलनाच्या खर्चाचा हिशेब मागणे रास्त नाही, असे मत या वेळी व्यक्त केले.

Web Title: The corporation will not even give the rupee to the treasury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.