कोरोनाकाळातील खर्चाचे उत्तरही खास सभेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST2021-06-22T04:09:02+5:302021-06-22T04:09:02+5:30

पुणे : कोरोना आपत्तीत गेल्या दीड वर्षात करण्यात आलेल्या खर्चाचे उत्तर आता महापालिकेच्या खास सभेत मिळणार आहे़ विरोधी ...

Coronation-era expenses also answered in a special meeting! | कोरोनाकाळातील खर्चाचे उत्तरही खास सभेत !

कोरोनाकाळातील खर्चाचे उत्तरही खास सभेत !

पुणे : कोरोना आपत्तीत गेल्या दीड वर्षात करण्यात आलेल्या खर्चाचे उत्तर आता महापालिकेच्या खास सभेत मिळणार आहे़ विरोधी पक्षाने कोरोनाकाळात केलेल्या २५ कोटींच्या कामांची बिले अदा केली का? हा साधा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला असता सभागृह नेते गणेश बिडकर जुलै महिन्यातील खास सभेत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ, असे सांगितले आहे़

पुणे शहरात गेल्या दीड वर्षापासून कोरोना आपत्तीमुळे सर्व विकासकामे ठप्प आहेत़ तर कोरोना आपत्ती निवारणासाठी महापालिका प्रशासनाकडून महापालिका अधिनियम कलम ‘६७ (३) क’ नुसार कुठलीही परवानगी न घेता विनाटेंडर कामे करून घेतली जात आहेत़ अशी साधारणत: गेल्या दीड वर्षात दीडशेहून अधिक कामे ही विनाटेंडर झाली आहेत़ यामध्ये वैद्यकीय उपकारणांची खरेदी, कोविड केअर उभारणी, औषध खरेदी, डॉ़ नायडू हॉस्पिटल नूतनीकरण, जम्बो हॉस्पिटल खर्च, ऑक्सिजन प्लॅट उभारणी आदी संबंधित कामे मोठ्या प्रमाणावर केली गेली आहेत़

आज चौदा महिन्यांनंतर प्रत्यक्ष झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत डॉ़ नायडू हॉस्पिटलमधील कामकाजाच्या मंजुरीचा विषय कार्यपत्रिकेवर आला़ तेव्हा नगरसेवक विशाल तांबे, बाबूराव चांदेरे यांनी आजच्या सात कार्यपत्रिकेवरील कोरोनासंबंधित केलेल्या २५ कोटी रुपयांच्या कामांची बिले अदा केली आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला़ तर नगरसेवक अरविंद शिंदे यांनी, कोरोना आपत्तीतील कामांचे विषय मुख्य सभेपुढे मान्यतेसाठी आले आहेत का, केवळ माहितीसाठी आले आहेत असा प्रश्न केला़ तर महाविकास आघाडीमधील बहुतांशी सदस्यांनी या विषयांवर प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली़ अखेरीस सभागृह नेते बिडकर यांनी जुलै महिन्यात कोरोना आपत्ती निवारण संबंधित कामांची माहिती देण्यासाठी व त्यावर झालेल्या खर्चांची सविस्तर माहिती व सादरीकरण करण्याकरिता खास सभा घेण्यात येईल व त्यावेळी सर्व तपशील सादर केला जाईल, असे सांगितले़

----------------------

Web Title: Coronation-era expenses also answered in a special meeting!