लस घेतली तरच कोरोना हद्दपार होईल: भरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:32+5:302021-04-11T04:11:32+5:30
इंदापूर : कोरोना हद्दपार करण्यासाठी आता राज्यातील नागरिकांनी मनामध्ये कोणतीही भीती बाळगता कामा नये. ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांनी, शासनाने ...

लस घेतली तरच कोरोना हद्दपार होईल: भरणे
इंदापूर : कोरोना हद्दपार करण्यासाठी आता राज्यातील नागरिकांनी मनामध्ये कोणतीही भीती बाळगता कामा नये. ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांनी, शासनाने प्रमाणित केलेली कोविशिल्ड लस प्रत्येकाने टोचणे गरजेचे आहे. तरच कोरोना मुळापासून हद्दपार करता येईल, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात राज्यमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट रुग्णालयात जाऊन, कोविशिल्ड १९ लस टोचून घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यमंत्री भरणे बोलत होते. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. विनोद राजपुरे, डॉ. सुहास शेळके, डॉ. राहुल गार्डे, डॉ. देविदास बोंगाणे उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागात देखील कोरोना रुग्ण वेगाने वाढत आहेत. तरी देखील काही प्रमाणात लसीसंदर्भात जुन्या विचारांच्या नागरिकांचे गैरसमज आहेत. परंतु या लसीकरणाबद्दल कोणतेही गैरसमज मनात न घेता कुटुंबातील सर्व व्यक्तींसाठी ही लस वर्धनीय, लाभदायक आहे. तर आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे. त्यामुळे गावातील सुज्ञ नागरिकांनी आपल्या घरापासून पूर्ण गावापर्यंत, तालुक्यापर्यंत आपल्याशी निगडित असणाऱ्या सर्व नागरिकांना लसीकरण करून घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, अशीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यांमध्ये सर्व आरोग्य केंद्रात लस उपलब्ध आहे. व आपल्या सोयीनुसार नागरिकांनी ही लस टोचून घेतली पाहिजे. तालुक्यामध्ये शासनाच्या नियमानुसार लसीकरण शंभर टक्के करून घ्यायचे आहे. यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स, परिचारिका परिश्रम घेत असून, आपण सहकार्याची भावना करत स्वतःच्या सुरक्षेसाठी लसीकरण केले पाहिजे. असेही मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
१० इंदापूर भरणे
इंदापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे लस टोचून घेताना.