पुणे : पुण्यातील जम्बो हॉस्पिटल म्हणजे असुविधांचे भांडार, अपुरी वैद्यकीय उपचार यंत्रणा, रुग्णांची हेळसांड यांसारख्या अनेक तक्रारी समोर आल्याने प्रतिमा झालेले हे हॉस्पिटल आता नवी कात टाकू लागले आहे. तक्रारींचा पाऊस अनुभवलेल्या जम्बो चे रुपडे पालटू लागले आहे. हळूहळू येथील आरोग्य यंत्रणा सक्षम होतेय तसेच आता इथून रुग्ण बरे होऊन घरी जाण्यास देखील सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे महापालिकेने उभे केलेल्या जम्बो हॉस्पिटलबद्दल आता आशादायी व सकारात्मक चित्र निर्माण होऊ लागले आहे.
पुणे महापालिकेने जम्बो हॉस्पिटलकडे विशेष लक्ष देऊन, आपल्या क्षमतेप्रमाणेच येथे रूग्ण दाखल करून घेण्याची प्रक्रिया प्रारंभ केली आहे. येत्या दोन दिवसात येथे आणखी १०० ऑक्सिजन बेड व ६० आयसीयू बेड पूर्णपणे कार्यरत होणार असून, यात ३० व्हेंटिलेटर बेड उपलब्ध राहणार आहेत, अशी माहिती रुबल अगरवाल व महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पीपीई किट घालून जम्बो हॉस्पिटलमध्ये प्रवेश करत तेथील आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय उपचार पद्धती,रुग्णांची परिस्थिती पाहणी केली. तसेच यादरम्यान स्वतः २० रूग्णांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली.तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही सूचना देखील यावेळी महापौरांनी दिल्या. सद्यस्थितीला १७८ कोविड-१९ चे रूग्ण उपचार घेत असून, यापैकी ३८ जण आयसीयूमध्ये तर ११ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. जम्बो हॉस्पिटलच्या व्यवस्थापनची जबाबदारी असलेल्या लाईफ लाईन एजन्सीकडून काम काढून घेण्याची प्रक्रिया एकीकडे सुरू असताना, त्याचवेळी महापालिकेने विविध एजन्सींच्या माध्यमातून ५९ डॉक्टर व १४० पॅरामेडिकल स्टाफ येथे उपलब्ध करून देऊन रूग्णांना वेळेत उपचार मिळतील याची व्यवस्था केली आहे.