पुणे : महापालिकेकडून कोरोना रुग्णांसंदर्भातील दैनंदिन आकडेवारी दिली जात नसल्यामुळे उडालेला गोंधळ 'लोकमत'ने समोर आताच हा गोंधळ दूर करण्याकरिता पालिकेने आता अतिरिक्त आयुक्तांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आल्याची आणि शनिवारपासून प्रत्यक्ष या कामाला सुरुवात झाल्याची माहिती पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
केंद्र व राज्य शासनाकडे जाणारी कोरोना रूग्णांची आकडेवारी मागील काही दिवसात अँपवर अपडेट करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुण्यातील रुग्णसंख्या एकदम वाढल्याचे दिसून आले. वास्तविक पुण्याची सक्रिय रूग्णांची संख्या त्यापेक्षा खूपच कमी होती. पुणे देशातील हॉटस्पॉट ठरल्यामुळे देशभरात पुण्याची नाहक बदनामी झाली. पालिकेने वेळेत योग्य डाटा न भरल्यामुळे हा प्रकार घडला असून यामध्ये पालिकेची चूक असल्याचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी जाहीररीत्या सांगितले होते.
कोरोनाचे दैनंदिन 'अपडेट' न देण्यात विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिका, पिंपरी चिंचवड आणि जिल्हा प्रशासनामधील समन्वयाचा अभाव कारणीभूत ठरत असून त्यामुळे लोकांमध्ये विनाकारण भीती निर्माण होत आहे. अद्यापही सुधारणेला बराच वाव असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून त्रुटी दूर कराव्यात असे मत सर्वपक्षीय नेत्यांनी 'लोकमत'च्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
'लोकमत'ने सलग तीन दिवस या विषयाचा बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर पालिका आयुक्तांनी ही सर्व अद्ययावत माहिती वेळेत भरली जाईल यासाठी अतिरिक्त आयुक्त (विशेष) शांतनू गोयल यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. यासंदर्भात गोयल यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले खासगी रुग्णालयांची दैनंदिन आकडेवारी व्यवस्थित भरली जाईल यासाठी मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली आहे. यासोबतच कोविड केअर सेंटर्समधील मागील अनेक दिवसांची राहिलेली माहिती आणि दैनंदिन माहिती भरण्यात येणार आहे. या कामासाठी निवडक मनुष्यबळ नेमण्यात आले आहे. या कामाचा स्वतः पाठपुरावा करीत असून काही दिवसातच सर्व अद्ययावत माहिती अपडेट होईल असे गोयल म्हणाले.
----------
कोरोना दैनंदिन आकडेवारीच्या अपूर्ण माहितीमुळे उडालेला गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांच्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या कामासाठी निवडक मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली असून शनिवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली आहे.
- विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त