जिल्ह्यात ४०० गावांत एक एप्रिलपासून कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:11 IST2021-03-26T04:11:12+5:302021-03-26T04:11:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशात लवकरच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट कोरोना लसीकरण करण्यात येणार ...

जिल्ह्यात ४०० गावांत एक एप्रिलपासून कोरोना लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशात लवकरच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेत जिल्ह्यातील तब्बल ४०० गावांमधील आरोग्य उपकेंद्रांमध्ये कोरोना लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. येत्या एक एप्रिलपासून या ठिकाणी प्रत्यक्ष लसीकरण सुरू होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
गेल्या काही दिवसांत शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यात टेस्टिंग, ट्रेसिंग वाढविण्यासोबतच जास्तीत जास्त लोकांचे लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाची क्षमता येत्या १ एप्रिलपासून दोन ते तीन पटीने वाढविण्यात येणार आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. पुढच्या टप्प्यात जिल्ह्यात ५३९ आरोग्य उपकेंद्रे असून, यापैकी किमान ४०० केंद्रांवर कोरोना लसीकरण सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या दोन दिवसांत या उपकेंद्रांवरील सोयी-सुविधांची पडताळणी करून ही लसीकरण केंद्रे सुरू केली जातील.
सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरण केले जाते. ३ लाख २१ हजार जणांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. आता लसीकरण केंद्रांची संख्या वाढविताना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य उपकेंद्रांचा प्रस्ताव पुढे आला आहे. ग्रामीण भागात ५३९ आरोग्य उपकेंद्रे आहेत. त्यामध्ये विजेची सुविधा, इंटरनेटची कनेक्टिव्हिटी, COVID तसेच सध्या सुरू असणाऱ्या लसीकरण केंद्रापासून उपकेंद्राचे असणारे १९ अंतर या सगळ्यांचा विचार करून केंद्राची निवड करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
------
लसीकरणासाठी पाच लोकांची टीम
लसीकरण केंद्रासाठी पाच जणांचे पथक असेल. यामध्ये लस टोचणी आरोग्य कर्मचारी, गार्ड, निरीक्षक, गर्दी नियंत्रक आणि लस अधिकारी यांचा समावेश असेल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.
-----
ग्रामीण भागात ५७८८ ॲक्टिव्ह रुग्ण
सध्या ग्रामीण जिल्ह्यात ४२७८ तर नगरपालिका क्षेत्रात १५१० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक ९०२ रुग्ण हवेली तालुक्यात असून, शिरूर तालुक्यातील रुग्णांची संख्या ५०२ आहे. नगरपालिका क्षेत्रात बारामतीमध्ये ४६८, तर तळेगाव दाभाडेमध्ये २३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
-------
राज्यात पुणे जिल्हा परिषद आघाडीवर
कोरोना लसीकरणामध्ये पुणे जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य उपकेंद्रामध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरू झाल्यानंतर असे केंद्र सुरू करणारी पुणे जिल्हा परिषद राज्यात पहिली ठरणार आहे. किमान ४०० केंद्रे नव्याने सुरू होतील. प्रत्येकी किमान १००
लसींचे डोस देण्याची क्षमता असणार आहे. परिणामी, दोन ते तीन पटीने लसीकरण क्ष वाढू शकेल.
---