पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ७ कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत प्राण गमवावे लागले आहेत. तसेच अनेक कर्मचारी सध्या कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात व घरी उपचार घेत आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाने प्रतिबंधक उपाय म्हणून विद्यापीठ कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना विद्यापीठातील प्रवेश बंद केला. शासन नियमाप्रमाणे अत्यावश्यक विभाग वगळता इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विद्यापीठातील सेवकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेतली. त्यात प्राधान्याने विद्यापीठ कर्मचाऱ्यांना व त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना लस देण्याचा निर्णय घेतला. मात्र, लसींचा आवश्यक साठा उपलब्ध होत नसल्याने सर्व कर्मचाऱ्यांना लस देणे अद्याप शक्य झाले नाही.
विद्यापीठातील समीर नेवकर (वित्त विभाग), विश्वास आव्हाड (भूगोल विभाग), गजेंद्र तारडे (परीक्षा विभाग), शंकर भालेराव (परीक्षा विभाग), संजय गायकवाड (परीक्षा विभाग), प्रभाकर शिरसे (स्थावर विभाग) आणि अशोक भोसले (मध्यवर्ती कार्यशाळा विभाग) या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. विद्यापीठातील आपले सहकारी कोरोनामुळे दगावले. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विद्यापीठातील वसाहतीमध्ये राहणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या पूर्ण कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अनेक कर्मचारी उपचार घेऊन घरी परतले आहेत. परंतु यापुढील काळात कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाबत आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून केले आहे.
विद्यापीठातील तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात एका प्रोग्रॅमरचा समावेश आहे. या प्रोग्रॅमरकडे निकाल तयार करण्याचे काम होते. त्यामुळे आता इतर कर्मचाऱ्यांवर या कामाची जबाबदारी येऊन पडणार आहे. विद्यापीठातील ७ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी गेल्याने विद्यापीठातील कर्मचारी संघटनांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.