कोरोनाने आणला पोटावर पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:08 IST2020-12-09T04:08:47+5:302020-12-09T04:08:47+5:30
शहरात ७० हजार अधिकृत रिक्षाचालक आहेत. व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांचे रोजचे उत्पन्न बुडाले. शिल्लक रकमेवर महिना काढल्यावर पुढे त्यांचे ...

कोरोनाने आणला पोटावर पाय
शहरात ७० हजार अधिकृत रिक्षाचालक आहेत. व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांचे रोजचे उत्पन्न बुडाले. शिल्लक रकमेवर महिना काढल्यावर पुढे त्यांचे हालच सुरू झाले. रिक्षाचे कर्जाचे हप्ते थकले. पहिल्या ३ महिन्यानंतरच कर्जदारांनी त्रास देणे सुरू केले. काहींच्या रिक्षा ओढून नेल्या. आता व्यवसाय सुरू झाला तरी अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अजूनही बहुसंख्य रिक्षाचालक हलाखीतच दिवस काढत आहेत.
हॉटेलांची चूल बंद
पंचतारांकित हॉटेलांपासून ते चहाच्या टपरीचालकापर्यंत प्रत्येकाला कोरोनाचा फटका बसला. या सर्वांची मिळून शहरातील एकूण संख्या २५ हजारांपेक्षा जास्त आहे. त्यातले भाडे त्तत्वावर असणारी अनेक हॉटेल्स बंदच झाली. भाडे परवडेना, कामगारांना वेतन देणे शक्य होईनासे झाले, कारण सगळ्या व्यवसायच बंद होता. अजूनही त्यांच्यातील अनेकजण कोरोनाने दिलेल्या धक्क्यातून सावरलेले नाहीत.
पथारीवाले झाले बेकार
रस्त्यावर बसून व्यवसाय करणाºयांची शहरातील संख्या ५० हजारांच्या आसपास आहे. रोज व्यवसाय करायचा, त्यातूनच दुसºया दिवसाचा माल आणायचा व घरखर्चही काढायचा ही यांची जगण्याची पद्धत. कोरोनाने त्यांच्या या जगण्यावरच संक्रात आणली. करायचे काय व कमवायचे काय व मुख्य म्हणजे खायचे काय असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. एकही टपरी किंवा हातगाडी या काळात सुरू नव्हती. आता अनलॉकनंतर कुठे त्यांना थोडी उभारी मिळायला लागली आहे.
खानावळी राहिल्या कशाबशा सुरू
परगावाहून येणारे विद्यार्थी, नोकरदार, घरात करणारे कोणी नसणारे वृद्ध नागरिक या सर्वांची क्षुधाशांती शहरातील खानावळवाले करतात. त्यांची काही संघटना वगैरे नाही, मात्र त्यांचीही शहरातील संख्या किमान हजाराच्या घरात आहे. कोरोना काळात बहुतेक मेंबर गावी निघून गेल्याने यांनाही व्यवसाय गुंडाळून ठेवण्याची वेळ आली. तरीही काहींनी दया दाखवत जे पुण्यातच अडकले होते, त्यांच्या जेवणाची सोय केली. अनलॉकमुळे त्यांनाही आता दिलासा मिळाला आहे.
स्थानकांमधील बुटपॉलिश व विक्रेते
कोरोनाने प्रवास थांबला आणि बस-रेल्वे स्थानकावरील बुटपॉलिशचा व्यवसाय बुडाला. या व्यवसायावर पोट भरणाऱ्या व्यावसायिकांची अधिकृत संख्या २ ते ३ हजारांच्या आसपास आहे. त्या सगळ्यांचेच या काळात हाल झाले. आता बसगाड्या-रेल्वे सुरु झाल्याने त्यांचे व्यवसाय हळुहळू मार्गी लागत आहेत.