शाळेच्या स्वच्छतेवर नियंत्रण
By Admin | Updated: November 24, 2015 00:53 IST2015-11-24T00:53:25+5:302015-11-24T00:53:25+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले व उपसभापती नाना शिवले यांनी सुरू केलेल्या शाळापाहणी दौऱ्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.

शाळेच्या स्वच्छतेवर नियंत्रण
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले व उपसभापती नाना शिवले यांनी सुरू केलेल्या शाळापाहणी दौऱ्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. सभापतींनी केलेल्या मागणीनुसार शाळांच्या स्वच्छता कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय आयुक्त राजीव जाधव यांनी घेतला आहे.
महापालिका शाळांचा परिसर व स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची ऐशीतैसी झाली आहे. महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराचा फटका शिक्षण मंडळाला बसत आहे. शाळा इमारत व तेथील स्वच्छतेची जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची असते. परंतु, या मुद्द्यावरून शिक्षण मंडळावर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची वेळ आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सभापती घुले व उपसभापती शिवले यांनी पाहणी दौरा सुरू केला. पदाधिकारी शाळांची अचानक पाहणी करीत असल्याने धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
शाळांच्या स्वच्छतेचे काम खासगी ठेकेदारांना दिले आहे. त्यासाठी महापालिका वार्षिक तब्बल २ कोटी ७८ लाख रुपये या ठेकेदारांना मोजत आहे. त्यामुळे शाळांचा परिसर व तेथील स्वच्छतागृहे चकाचक असणे गरजेचे आहे. परंतु, उलट चित्र पाहणीत आढळले.
घुले यांनी शाळांच्या साफसफाई कामांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शिक्षण मंडळाकडे सुपूर्त करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी शाळांच्या साफसफाई कामावर संबंधित मुख्याध्यापक, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे नियंत्रण राहील, असे आदेश दिले आहेत.(प्रतिनिधी)