ठेकेदारांच्या बस पुन्हा मार्गावर
By Admin | Updated: October 3, 2015 01:48 IST2015-10-03T01:48:20+5:302015-10-03T01:48:20+5:30
पीएमपीला भाडेकराराने बस पुरविणाऱ्या ठेकेदारांनी अचानक बंद केलेल्या ६५३ बसेस शुक्रवारी सकाळपासून पुन्हा मार्गावर धावू लागल्या आहेत.

ठेकेदारांच्या बस पुन्हा मार्गावर
पुणे : पीएमपीला भाडेकराराने बस पुरविणाऱ्या ठेकेदारांनी अचानक बंद केलेल्या ६५३ बसेस शुक्रवारी सकाळपासून पुन्हा मार्गावर धावू लागल्या आहेत. त्यामुळे पीएमपीच्या तब्बल १२ लाख प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी, ठेकेदारांनी अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे पीएमपीचे झालेले आर्थिक नुकसान आणि तब्बल ७ लाख प्रवाशांची गैरसोय कोण भरून देणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री (दि. १) पीएमपीएलशी चर्चा करण्याची भूमिका ठेकेदारांनी घेतल्यानंतर आधी बससेवा सुरू करा अन्यथा चर्चा नाही नाही अशी भूमिका पीएमपीकडून घेण्यात आल्यानंतर ठेकेदारांनी ही सेवा सुरू केली आहे.
शहरातील प्रवाशांच्या सुविधेसाठी पीएमपीच्या मालकीच्या बसेसची संख्या कमी असल्याने खासगी ठेकेदारांकडून तब्बल ६५३ बसेस सात वर्षांच्या कराराने घेण्यात आल्या आहेत. तर २00 बसेस पीपीपी तत्त्वावर घेण्यात आलेल्या आहेत. पीएमपीकडून दररोज जवळपास १५00 बसेस संचलनात आणल्या जातात. पीएमपीकडून चुकीच्या पद्धतीने केली जाणारी दंड आकारणी आणि वेळेवर बिले मिळत नसल्याचे कारण पुढे करीत पाच ठेकेदारांनी गुरुवारी ( दि. १) ५३ बसेस दुपारी पीएमपीला कोणतीही कल्पना न देता, अचानक बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सायंकाळी शहरातील पीएमपी प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यातच या बंदबाबत कोणतीही कल्पना नसल्याने पीएमपीलाही जादा गाड्या सोडणे अवघड बनले होते.
त्यामुळे पीएमपीच्या सुमारे सातशे ते आठशे बस रस्त्यावर असल्या तरी, गाड्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना तास तास ताटकळत राहावे लागले होते. या आंदोलनाची कोणतीही कल्पना नसल्याने अनेकांनी खासगी वाहनांचा आधार घेत घर गाठले होते. मात्र, आज सकाळपासून पुन्हा वाहतूक सुरळीत झाली असल्याची माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी दिली. ठेकेदारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि ठेकेदारांची बैठक झाली असून, त्यात सर्व मागण्यांवर तोडगा काढण्यात आल्याचे कृष्णा यांंनी स्पष्ट केले.