विमाननगरला भामा-आसखेडचा दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:10 IST2021-02-08T04:10:06+5:302021-02-08T04:10:06+5:30
चंदननगर : मोठा गाजावाजा करत भामाआसखेडचे पाणी वडगाव शेरी मतदारसंघातील विमाननगर, धानोरी, लोहगाव, येरवडा, वडगावशेरी या भागात आले. मात्र, ...

विमाननगरला भामा-आसखेडचा दूषित पाणीपुरवठा
चंदननगर : मोठा गाजावाजा करत भामाआसखेडचे पाणी वडगाव शेरी मतदारसंघातील विमाननगर, धानोरी, लोहगाव, येरवडा, वडगावशेरी या भागात आले. मात्र, केवळ उद्घाटनाची घाई राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांनी केल्याने आज दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे.
गेल्या महिन्यात १ जानेवारीला मुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत भामा-आसखेड योजनेच्या पाण्याची सुरुवात केली. भामा-आसखेड योजनेतून वडगाव शेरी मतदार संघासाठी पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, केवळ उद्घाटनाची घाई केल्यामुळे आज नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. योजना आम्ही पूर्ण केली असे ढोल बडवणारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे नेते, कार्यकर्ते आठ दिवस झाले विविध भागात दूषित पाणीपुरवठा होत असताना गप्प का ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या योजनेचे श्रेय लाटण्यासाठी केलेल्या घाईमुळे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना तपासणी करण्यास पूर्ण वेळ मिळाला नाही.
याबाबत पाणीपुरवठा अधिकारी रमेश वाघमारे व दत्ता तांबारे यांच्या संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
अनेकांना जुलाब-उलट्याचा त्रास
विमाननगरमधील यमुनानगर, भीमनगर विमाननगर या भागातील ७०० हून अधिक घरांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून मनपा प्रशासनाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्याने नागरिकांना गॅस्ट्रो सारखे आजारांना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना जुलाब-उलट्याचा त्रास होत असल्याचे यमुनानगरमधील रहिवासी विनोद बनसोडे यांनी सांगितले. मात्र, तरीदेखील पाणीपुरवठा अधिकारी किंवा कोणत्याही स्थानिक नगरसेवकांनी लक्ष न घातल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.
... तर आम्ही अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजणार
पाणीपुरवठा अधिकारी यांना लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. येत्या दोन दिवसांत स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास आम्ही अधिकाऱ्यांना भामा आसखेड योजनेचे दूषित पाणी पाजणार असल्याचे कल्पेश यादव यांनी सांगितले.
फोटो : वडगाव शेरी भागात भामा आसखेड योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, मागील आठ दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे.