महिन्यापासून संपर्कसेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2015 22:42 IST2015-06-18T22:42:19+5:302015-06-18T22:42:19+5:30
एकलहरे येथील बीएसएनएलचा मोबाईल टॉवर बंद असल्यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या एक महिन्यापासून

महिन्यापासून संपर्कसेवा विस्कळीत
कडूस : एकलहरे येथील बीएसएनएलचा मोबाईल टॉवर बंद असल्यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या एक महिन्यापासून संपर्कसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. खेड तालुक्याच्या या दुर्गम डोंगरी आदिवासी मावळ भागात बीएसएनएल मोबाईलशिवाय दुसरे कोणतेही संपर्काचे साधन नसल्यामुळे परिसरातील आदिवासी नागरिकांची मोठी अडचण होत आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी मावळ भागात मोठ्या प्रमाणावर डोंगराळ भाग असल्यामुळे या परिसरात केवळ बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर बसविण्यात आलेला आहे. एकलहरे येथे असलेला हा टॉवर गेल्या एक महिन्यापासून बंद अवस्थेत आहे.
या परिसरातील नागरिकांचे संपर्काचे साधन तुटले आहे.
या परिसरात वीज खंडित असल्याच्या कारणावरून एकलहरे येथील मोबाईल टॉवर वारंवार कायम बंद असल्याचे सांगण्यात येते; मात्र प्रत्यक्षात संपर्क सेवा कायम सुरू ठेवण्यासाठी कंपनीने जनसेट दिलेला आहे.
परंतु जनसेटच्या इंधनाचा खर्च नको याकरिता येथील अधिकारी व कर्मचारी हा मोबाईल टॉवर कायम बंद ठेवून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत असल्याचा आरोप परिसरातील रहिवासी व खेड तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब पोखरकर यांनी केला आहे.
हा टॉवर त्वरित सुरू करावा; अन्यथा खेड तालुका पश्चिम भागाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बाळासाहेब पोखरकर यांनी लेखी निवेदनाद्वारे खेड तहसीलदार प्रशांत आवटे यांना दिला आहे. (वार्ताहर)