संपर्कप्रमुखांवर प्रश्नांचा भडीमार
By Admin | Updated: February 25, 2015 00:36 IST2015-02-25T00:36:51+5:302015-02-25T00:36:51+5:30
शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर शहर पदाधिकारी, नगरसेवक आणि माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी असंख्य वेगवेगळे प्रश्न,

संपर्कप्रमुखांवर प्रश्नांचा भडीमार
पिंपरी : शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर शहर पदाधिकारी, नगरसेवक आणि माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी असंख्य वेगवेगळे प्रश्न, अडचणी आणि शंकांचा अक्षरश: भडीमार केला. त्यास समर्पक उत्तरे देत त्यांनी संवाद साधला. सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीसाठी पक्षबांधणीच्या दृष्टीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
काळेवाडी येथील एका हॉटेलमध्ये सायंकाळी मेळावा झाला. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांपुरता तो मर्यादित होता. डॉ. कोल्हे यांच्या हस्ते शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मेळाव्याची सुरुवात झाली. या वेळी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, महिला शहर संघटक सुलभा उबाळे, बाबासाहेब धुमाळ, शहर उपप्रमुख गजानन चिंचवडे, धनंजय आल्हाट, योगेश बाबर, सल्लागार मधुकर बाबर, महिला संघटक सुशीला पवार, नगरसेवक आदी उपस्थित होते.
शहरप्रमुख आणि शहर उपप्रमुखपदाची निवड झाली आहे. इतर पदांची नियुक्ती कधी केली जाणार, सभासद नोंदणी अभियान कधी घेणार, पक्षाला समांतर असलेल्या अनधिकृत संघटनांवर काय कारवाई करणार, महिलांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी काय योजना आहे, २०१७ च्या महापालिका निवडणुकीसंदर्भात नियोजन कधी करणार, पक्षाच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर कसा करावा, पक्षाबरोबरच विविध आघाड्यांची बांधणी कधी करणार आदी प्रश्नांसह विविध अडचणी, शंका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विचारल्या. त्यावर कोल्हे यांनी समर्पक उत्तरे देत समाधान करण्याचा प्रयत्न केला.
अनधिकृत बांधकामे नियमित करणे, शास्तीकर रद्द करणे या संदर्भात आकुर्डीत नुकताच संघर्ष मेळावा झाला. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मरणपत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले होते, असे कोल्हे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)