बांधकामे, जलतरण तलाव अजूनही सुरूच
By Admin | Updated: July 15, 2014 03:54 IST2014-07-15T03:54:32+5:302014-07-15T03:54:32+5:30
शहरात आजपासून दिवसाआड पाणी देण्यास सुरुवात केल्यानंतर शहरातील बांधकामे, जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर, तसेच हॉटेलमधील शॉवर बाथ बंद करण्याची भीम गर्जना

बांधकामे, जलतरण तलाव अजूनही सुरूच
पुणे : शहरात आजपासून दिवसाआड पाणी देण्यास सुरुवात केल्यानंतर शहरातील बांधकामे, जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर, तसेच हॉटेलमधील शॉवर बाथ बंद करण्याची भीम गर्जना महापालिका आयुक्तांसह महापौरांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. मात्र, त्याची अंमलबजाणी आज शहरात कोठेच दिसून आली नाही. विशेष म्हणजे याबाबतचे आदेश घोषणा केल्यानंतर तत्काळ काढणे अपेक्षित असताना, आज दुपारनंतर महापालिका आयुक्तांनी त्यावर स्वाक्षरी केली. त्यामुळे वरीलपैकी कोणत्याही आस्थापनेस पालिकेस सूचना देता आल्या नाहीत. त्यामुळे एकीकडे पुणेकरांच्या तोंडचे पाणी कमी झाले असले, तरी वरील सर्व ठिकाणी आज दिवसभर पाण्याचा वापर राजरोसपणे सुरूच असल्याचे शहभर दिसून आले.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठलेला आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठी १५ आॅगस्टपर्यंत राखीव ठेवण्यासाठी महापालिकेकडून शहराला दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे हा निर्णय घेतानाच पालिकेने पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी शहरातील बांधकामे तत्काळ थांबविणे, शहरातील सर्व वॉशिंग सेंटर बंद करणे, जलतरण तलाव बंद करणे, तसेच पंचतारांकित हॉटेलमधील बाथ टब आणि शॉवरच्या वापरावर नियंत्रण आणणे असा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय मागील आठवड्यात शुक्रवारी महापालिका आयुक्त विकास देशमुख आणि महापौर चंचला कोद्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरही केला. मात्र, गेल्या दोन दिवसांत निर्णय अंमलबजावणीबाबत काहीच हालचाल करण्यात आली नाही. पालिका बंद असल्याचे कारण पुढे करीत त्याबाबत कोणतेही लेखी आदेश काढण्यात आले नाहीत. त्यामुळे या आदेशाचा आज फज्जा उडाला. शहरात सर्वत्र जलतरण तलावांसह बांधकामे सुरूच होती. तसेच वॉशिंग सेंटरच्या बाहेरही वाहनांच्या रांगा दिसून येत होत्या. त्यामुळे प्रशासनालाच पालिका आयुक्तांच्या आदेशाचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)