मेट्रो मार्गिकेवरील बांधकाम परवानग्या रखडल्या
By Admin | Updated: September 23, 2014 06:48 IST2014-09-23T06:48:00+5:302014-09-23T06:48:00+5:30
प्रस्तावित मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला ५०० मीटरपर्यंत ४ चटई क्षेत्र निर्देशांक देण्यात येणार आहे

मेट्रो मार्गिकेवरील बांधकाम परवानग्या रखडल्या
पुणे : प्रस्तावित मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला ५०० मीटरपर्यंत ४ चटई क्षेत्र निर्देशांक देण्यात येणार आहे. त्याविषयीच्या नियमावलीनुसार दोन्ही बाजूच्या प्रभावित क्षेत्रात बांधकाम परवानगी देताना ‘मेट्रो सेल’चा ना हरकत दाखला आवश्यक आहे. परंतु, मेट्रोसाठी ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ (एसपीव्ही) सेल अस्तित्वात आली नसल्याने प्रभावित क्षेत्रात बांधकाम परवानग्या रखडल्या आहेत. त्यामुळे जणू विकासाला जॅमर लागला आहे.
वनाज ते रामवाडी आणि चिंचवड ते कात्रज या दोन्ही प्रस्तावित मार्गांचा प्रस्ताव महापालिका व राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला पाठविण्यात आला आहे. मात्र, केंद्रातील विविध खात्यांच्या मान्यतेअभावी पुणे मेट्रोला मंजुरी रखडलेली आहे. दरम्यान, महापालिकेने मेट्रोच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तरतुदींची नियमावली नुकतीच प्रसिद्ध केली. त्यावर नागरिकांनी सुमारे पाच हजार हरकती-सूचना दाखल केल्या आहेत. त्यावर अद्याप सुनावणी झाली नसली, तरी नियमावली अंशत: लागू झालेली आहे.
त्यामुळे मेट्रोमार्गाच्या दोन्ही बाजूला ५०० मीटरपर्यंत देण्यात येणाऱ्या ४ एफएसआयवर अनेक नागरिकांनी आक्षेप नोंदविले आहेत. नवीन नियमावलीनुसार मेट्रो प्रभावित क्षेत्रात बांधकाम परवानगी देताना ‘एसपीव्ही’ सेलचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. परंतु, पुण्यातील मेट्रोसाठीच्या एसपीव्हीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे रखडला आहे. त्यामुळे मेट्रो सेल अद्याप अस्तित्वात आलेला नाही. त्यामुळे मेट्रो प्रभावित क्षेत्रात बांधकाम परवानगीसाठी ना हरकत देण्याचे काम थांबलेले आहे. (प्रतिनिधी)