बांधकाम मजुरांच्या पगाराला फटका

By Admin | Updated: November 16, 2016 03:18 IST2016-11-16T03:18:40+5:302016-11-16T03:18:40+5:30

पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्याने निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीचा फटका बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजुरांच्या

Construction of labor wages | बांधकाम मजुरांच्या पगाराला फटका

बांधकाम मजुरांच्या पगाराला फटका

वाघोली : पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्याने निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीचा फटका बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजुरांच्या पगाराला पडला आहे. वाघोलीमध्ये आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी बांधकाम साईटवरील मजुरांचा होणारा पगार फक्त घरखर्च, खाण्या-पिण्यापुरताच ठेकेदारांकडून करण्यात आला आहे. ठेकेदाराचीच रक्कम मिळाली नसल्याने या मजुरांकडून थोडक्यामध्ये घरखर्च भागविला जात आहे.
चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे व हजारांच्या नोटांची बदली मध्यमवर्गीय नागरिकांकडून गेल्या पाच दिवसांपासून केल्या गेल्या असल्याने मंगळवारी व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. दैनंदिन रोखीचे व्यवहार चालणाऱ्या तरकारी, मोबाईल, किराणा, खाद्यपदार्थ दुकानामध्ये सुट्या पैशांची रेलचेल वाढली असली तरी ३ ते १० हजारांच्या मध्ये होणाऱ्या एकरकमी व्यवहारामध्ये अद्यापही सुधारणा झाली नाही. याचाच फटका बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजुरांना मोठ्या प्रमाणात बसला असल्याचे वाघोली परिसरामध्ये दिसत आहे. वाघोलीमध्ये इतर जिल्हा आणि राज्यांतून कुटुंबासह आलेल्या बांधकाम मजुरांची संख्या लक्षणीय आहे.
प्रत्येक मंगळवारी आठवडे बाजार भरत असल्याने या बांधकाम साईटवरील मजुरांनादेखील यादिवशी साप्ताहिक सुटी आणि आठवड्याचा पगार एकदम दिला जातो. गेल्या आठवड्याच्या मंगळवारी रात्रीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजाराच्या नोटा बंद करण्याचे जाहीर केले होते. गेल्या आठवड्यामध्ये मंगळवारी एक आठवडा पुरेल एवढा बाजार मजुरांनी भरला होता, तर परप्रांतीय मजुरांनी पगारातील काही रक्कम गावाकडे पाठविली आहे. बुधवारपासून नोटा बंद झाल्या असल्या तरी या मजुरांना दैनंदिन व्यवहारामध्ये याचा फटका काही प्रमाणात बसला आहे. प्रत्येक मंगळवारी होणाऱ्या पगाराच्या दिवशी मात्र सर्वाधिक फटका मजुरांना बसला आहे. बांधकाम साईटवरील ठेकेदारालाच संबंधितांकडून पैसे आले नसल्याने ठेकेदाराकडूनदेखील बांधकाम मजुरांना पगार देण्यामध्ये अडचणी येत आहेत.
मजुरांना तात्पुरत्या स्वरुपात घरखर्च, खाण्यापिण्यासाठी पगार दिला गेला आहे. आर्थिक चणचण सर्वांनाच असल्याचे माहीत असल्याने मजूरवर्गानेदेखील ठेकादाराकडून खर्चासाठीचेच पैसे घेतले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात आले आहे. आजच्या आठवडे बाजारामध्ये मजूरवर्ग आवश्यक असणाऱ्या वस्तूच खरेदी करताना दिसत होता. (वार्ताहर)

Web Title: Construction of labor wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.