कॉँग्रेस, राष्ट्रवादीला कायम धक्काच

By Admin | Updated: November 15, 2016 03:49 IST2016-11-15T03:49:19+5:302016-11-15T03:49:19+5:30

झोपडपट्टी, कष्टकरी वर्ग, गरीब, उपेक्षित म्हणजे आपला हक्काचा मतदार अशी काँग्रेसची समजूत होती. अनेक वर्षे त्यांना या वर्गाचे मतदान होत

Congress, NCP's constant shocks | कॉँग्रेस, राष्ट्रवादीला कायम धक्काच

कॉँग्रेस, राष्ट्रवादीला कायम धक्काच

पुणे : झोपडपट्टी, कष्टकरी वर्ग, गरीब, उपेक्षित म्हणजे आपला हक्काचा मतदार अशी काँग्रेसची समजूत होती. अनेक वर्षे त्यांना या वर्गाचे मतदान होत असायचे. त्याला पुष्टी मिळायची ती त्यांच्याच पक्षाचा उमेदवार निवडून येत असल्यामुळे. त्यातून मग काँग्रेसने येथील मतदारांना गृहीतच धरायला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले. या दोन्ही पक्षांना विधानसभेच्या दोन निवडणुकांमध्ये या परिसराने धक्का दिला. दोन्ही वेळा भाजपाला विजयी केले तरीही काँग्रेस अद्याप जागी व्हायला तयार नाही.
सेनेच्या अशोक हरणावळ व भाजपाच्या स्मिता वस्ते (जुना प्रभाग क्रमांक ५७) यांचा संपूर्ण प्रभाग, भाजपाच्याच धनंजय जाधव, मनीषा घाटे (जुना प्रभाग क्रमांक ५१) यांच्या प्रभागातील काही परिसराला जोडून हा नवा २९ क्रमांकाचा चार सदस्यांचा प्रभाग तयार करण्यात आला आहे. फायद्या-तोट्याचा विचार करणारा मतदार हे या प्रभागाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे दुपारचे तीन, चार वाजल्यानंतर मतदार मतदानाला घराबाहेर पडतात. तोपर्यंत ते उमेदवार किंवा त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या घरी चकरा मारायला लावतात.
सलग २ वेळच्या विधानसभा मतदारसंघातील विजयामुळे भाजपाला या प्रभागाची विशेष काळजी वाटत नसावी. एकेकाळी भरपूर राजकीय वजन असलेल्या शिवसेनेलाही त्यांनी कधीचेच मागे टाकले आहे. भाजपाचे असे वर्चस्व असल्यामुळेच सर्वाधिक इच्छुक भाजपाचेच आहेत. महिला आरक्षणामुळे काहींची (त्यात विद्यमानही आले) अडचण झाली, मात्र त्यावर त्यांनी घरातील महिलेसाठी उमेदवारी मागून पर्याय शोधला आहे. तसेच आरक्षण नसेल तर खुल्या जागेवरूनही लढण्याची तयारी जाहीरपणे दाखविली आहे. धनंजय जाधव तर इच्छुक आहेतच, शिवाय मनीषा घाटे, त्यांचे दीर धीरज घाटे, यांनीही उमेदवारी मागितली आहे. त्याशिवाय रघू बावडा, माजी नगरसेवक रमेश काळे, विनोद वस्ते, दीपक पोटे, महेश लडकत, सरस्वती शेंडगे, निकिता गेजगे, दीपाली वैराट अशी इच्छुकांची फौजच भाजपामध्ये आहे. उमेदवारी नाकारताना या पक्षाच्या नेत्यांना बरीच कसरत करावी लागेल असे दिसते. त्यातून कोणी नाराज होऊन पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचीही शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन्ही पक्षांना अडचण आहे ती या भागात त्यांच्याकडे नगरसेवकांचे बळ अगदीच कमी आहे ही. त्यामुळे त्यांचा डोळा भाजपातून फुटून कोणी येते आहे का यावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शाम मानकर हे प्रबळ दावेदार आहेत. त्याशिवाय विद्यमान नगरसेवक विनायक हनमघर यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसकडून विकास लांडगे, सुधीर काळे, किरण गायकवाड, यांची नावे चर्चेत आहेत. सक्षम महिला उमेदवार मिळाले तर संपूर्ण पॅनल करून हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे हा प्रभाग लढवू शकतील. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून महिला उमेदवारांचा शोध सुरू आहे.
सेनेकडून अशोक हरणावळ यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ते आरक्षणातही बसतात व खुल्या गटातही. मते खेचणारा चांगला सक्षम उमेदवार मिळाला तर खुल्या गटातूनही लढण्याची त्यांची तयारी आहे. मनसेची ताकद मर्यादितच आहे. पॅनल तयार करताना त्यांचीही महिला उमेदवाराचीच अडचण होणार असे दिसते आहे. शक्ती मर्यादित असली तरीही सेना व मनसे यांनी आपली पॉकेट्स तयार केली आहेत. प्रामुख्याने अशोक हरणावळ यांना त्यांच्या जुन्या प्रभागातून चांगली साथ मिळेल अशी चर्चा आहे. त्यामुळे तिकडे लक्ष कमी करून ते नव्याने समाविष्ट झालेल्या भागात जोर लावत असल्याचे दिसते आहे.
भाजपाने आपल्या प्रत्येक आमदारावर त्याच्या मतदारसंघात जास्तीतजास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यादृष्टीने सगळेच आमदार प्रयत्नाला लागले आहेत. आमदार माधुरी मिसाळ यांनीही त्यासाठी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारीसाठीची चाचपणीही त्या त्यातून करीत आहेत. अन्य पक्ष मात्र त्या तुलनेत अद्याप राजकीयदृष्ट्या सुरू झालेले नाही. ज्यांच्यासाठी ही राजकीय खळबळ सुरू आहे तो मतदारही या सगळ्या हालचालींकडे लक्ष ठेवून आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Congress, NCP's constant shocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.