वेल्ह्यात कॉँग्रेसकडे एकहाती सत्ता
By Admin | Updated: February 24, 2017 02:15 IST2017-02-24T02:15:05+5:302017-02-24T02:15:05+5:30
वेल्ह्यात एकनिष्ठ मावळ्यांच्या जोरावर पुन्हा एकदा कॉँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. सहापैकी पाच

वेल्ह्यात कॉँग्रेसकडे एकहाती सत्ता
मार्गासनी : वेल्ह्यात एकनिष्ठ मावळ्यांच्या जोरावर पुन्हा एकदा कॉँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. सहापैकी पाच जागांवर विजय मिळविला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक रेवन्नाथ दारवटकरांनी आपले अस्तित्व कायम ठेवत अपक्ष म्हणून एक जागा मिळविली आहे. अंतर्गत कुरघोडींमुळे वेल्ह्यातून राष्ट्रवादी पुन्हा एकदा हद्दपार झाली आहे. शिवसेना व भाजपाला वेल्ह्यातील जनतेने नाकारले आहे, तर मनसेच्या काही उमेदवारांनी जोरदार लढत दिली.
वेल्हे-मार्गासनी गटात सर्वात चुरशीची लढत झाली. पहिल्या फेरीपासून मनसे आघाडीवर होती. शेवटच्या फेरीपर्यंत मनसे व राष्ट्रवादीने जोरदार लढत दिली, तर या गटातून कॉँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दिनकर सोनबा धरपाळे यांनी अवघ्या ९६ मतांनी निसटता विजय मिळविला. त्यांना ४२८७ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीचे संतोष तुकाराम रेणुसे यांना ४१९१ मते मिळाली, मनसेचे गोपाळ दिनकर इंगुळकर यांना ४०३१ मते, शिवसेनेचे दत्तात्रय बाळासाहेब देशमाने यांना ३२५४, भाजपाचे भरत मोहनलाल सोलंकी यांना १५९१ मते, तर ३०० जणांनी नोटांचे बटण दाबले. या गटामध्ये नोटांचा वापर कमी झाला असता, तर त्यांचा फायदा इतर उमेदवारांना झाला असता. मार्गासनी गणातून कॉँग्रेसचे दिनकर पांडुरंग सरपाले विजयी झाले असून त्यांना २४४९ मते मिळाली आहेत, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे संदीप लहू खुटवड यांना २०७२, मनसेचे दत्तात्रय दिनकर चोरघे यांना २०६५ मते, शिवसेनेचे विशाल मारुती वालगुडे यांना १९७१ मते रिपाइंचे कुमुद तुकाराम गंगावणे यांना ३६६, भाजपाचे रवींद्र रघुनाथ दसवडकर यांना ४७५ मते मिळाली असून, १६२ मतदारांनी वरीलपैकी एकही नाहीचे बटण दाबले आहे. या गणामध्ये नेहमी वांगणी पंचक्रोशीतील उमेदवार विजयी होत असतो. परंतु या ठिकाणी मनसेची व राष्ट्रवादीची त्याचबरोबर वांगणी गावातीलच रिपाइंकडून कुमुद गंगावणे यांना उमेदवारी दिल्याने मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा कॉँग्रेसला होऊन उमेदवार विजयी झाले.
वेल्हे गणातून कॉँग्रेसच्या संगीता प्रकाश जेधे विजयी झाल्या असून त्यांना २७७८ मते मिळाली आहेत, तर शिवसेनेच्या अनिता विलास गांडले यांना २१७० मते, कॉँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या सुषमा नामदेव रेणुसे यांना १७०४ मनसेच्या रूपाली सुरेश शिंदे यांना १००८ मते मिळाली आहेत. १५२ मतदारांनी नोटांच्या बटणास पसंती दिली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी व भाजपा यांचे अर्ज बाद झाले होते. अपक्ष असलेल्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सुषमा रेणुसे यांना राष्ट्रवादी कॉँग्रेस पुरस्कृत उमेदवारी दिली गेल्याने राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांनी नाराज होऊन कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने येथे राष्ट्रवादीला फटका बसून कॉँग्रेसच्या संगीता प्रकाश जेधे विजयी झाल्या.
जिल्हा परिषद कुरण खुर्द गटातून कॉँग्रेसचे अमोल उल्हास नलावडे विजयी झाले असून त्यांना ५५६४ मते मिळाली आहेत.
रेवन्नाथ दारवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तोरणा विकास आघाडीचे अशोक हनुवती रेणुसे यांना ३३०८ मते मिळाली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंकुश बबन दसवडकर यांना २९०१ मते मिळाली, तसेच कॉँग्रेसमध्ये बंडखोरी केलेले भाजपाचे भगवान ज्ञानोबा पासलकर यांना २५०७ मते मिळाली. माजी पंचायत समिती सदस्य शिवसेनेचे राजेश मारुती निवंगुणे ११२७ मते मिळाली आहेत, तर या गटात नोटाच्या बटणास १०१ लोकांनी पसंती दिली.
कुरण खुर्द गणात कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू राऊत यांची पत्नी सीमा विष्णू राऊत या विजयी झाल्या आहेत. त्यांना ३३५१ मते मिळाली आहेत, तर तोरणा विकास आघाडीचे आशा अंकुश पासलकर यांना १४४६, तर भाजपाच्या शीतल देविदास हनमघर यांना १३१८ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या नंदा राहुल ठाकर यांना १२७५ मते व मनसेच्या मेगा संपत मोरे यांना ९४३ मते मिळाली आणि १४३ लोकांनी नोटांचे बटण दाबले आहे.
विंझर गणातून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक यांनी तोरणा विकास आघाडी उभी केली होती. या ठिकाणी दारवटकरांनी स्वत:चे पुत्र अनंता रेवन्नाथ दारवटकर यांना उभे केले होते. अनंता रेवन्नाथ दारवटकर विजयी झाले असून त्यांना २९३४ मते मिळाली आहेत.
कॉँग्रेसचे कैलास दत्तात्रय शेंडकर यांना २७४७, तर मनसेचे गणेश धोंडिबा दारवटकर यांना १८३७ मते, राष्ट्रवादीचे शंकर रामचंद्र रानवडे यांना ९०६, भाजपाच्या रोहिणी राजू रेणुसे यांना ७१७, तर शिवसेनेचे सतीश मारुती शेलार यांना ४९३ मते मिळाली असून २१२ जणांनी नोटांचे बटण दाबले आहे. (वार्ताहर)