काँग्रेसला एक नाही ३ जागा
By Admin | Updated: September 26, 2014 05:35 IST2014-09-26T05:35:32+5:302014-09-26T05:35:32+5:30
विधानसभा निवडणूकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील तीनपैकी एक जागा मिळावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती.

काँग्रेसला एक नाही ३ जागा
पिंपरी : विधानसभा निवडणूकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील तीनपैकी एक जागा मिळावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी तुटल्याने काँग्रेसला शहरात तीन आणि मावळात एक जागा मिळणार आहेत. त्यामुळे सक्षम उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा दिवसांपूर्वी शहरातील एका कार्यक्रमात शहरातील तीन आणि मावळातील एक अशा चार जागांवरून तयारी करावी अशी सूचना दिली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी होती. तीनपैकी एक जागा द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे व शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली होती. रविवारी झालेल्या काँग्रेस पक्ष निरिक्षकांच्या बैठकीत शहरात काँग्रेसला जागा मिळावी, स्वबळाचीही तयारी करा, असे संकेत निरिक्षकांनी दिले होते. काँग्रेसने गुरुवारी पहिली यादी जाहिर केली. त्यात शहरातील एकाचीही उमेदवारी जाहिर केली नाही. राष्ट्रवादीने तीनही जागांवर दावा केल्याने न केल्याने कार्यकर्त्यांत कमालीची नाराजी होती. तरिही एक जागा मिळेल अशी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिवसभर आशा होती. सायंकाळी अचानकपणे राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली. त्यामुळे मागितली होती एक जागा आता तीनही जागा लढविता येणार आहे.
आमदार विलास लांडे, त्यांचे कट्टर विरोधक महेश लांडगे कोणता निर्णय घेतात, यावरही काँग्रेसची उमेदवारी कोणाला जाणार हे निश्चित होणार आहे. माजी महापौर हनुमंत भोसले, माजी नगरसेवक विश्वास गरजमल यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. मावळमधून अनेक महिन्यापासून तयारीत असणारे किरण गायकवाड यांची निवड पक्की झाली आहे. पिंपरी-चिंचवड राजकारणात माजी महापौर पानसरे, शहराध्यक्ष सचिन साठे कोणते उमेदवार देतात, यावर उमेदवार ठरणार आहेत.