पुणे: राज्यघटना हा देशाचा आत्मा आहे. संस्थाने, प्रांत यात विखुरलेला देश राज्यघटनेनेच एकसंध केला. तो तसाच ठेवायचा असेल तर प्रथम राज्यघटनेवरील हल्ले थांबवायला हवेत. याची सर्वाधिक जबाबदारी राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसवरच आहे असे प्रतिपादन राज्यसभेची माजी खासदार, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.
सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारले त्याचे स्मरण म्हणून काँग्रेसच्या वतीने २ ते ९ डिसेंबरदरम्यान साजऱ्या करण्यात येणाऱ्या सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताहात शुक्रवारी केतकर यांची राज्यघटना या विषयावर व्याख्यान झाले. संविधान रक्षक पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. गांधी विचारांचे अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्य संयोजक मोहन जोशी, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरिक्षक विकास पासलकर व्यासपीठावर उपस्थित होते.
केतकर यांनी घटनानिर्मितीपासूनचा विस्ताराने आढावा घेत देशाच्या संबधात राज्यघटनेचे महत्व विषद केले. महात्मा गांधी, पंडित नेहरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच देशात घटनानिर्मिती झाली. तोपर्यंत देश वेगवेगळ्या प्रातांमध्ये, ५६५ संस्थानांमध्ये विखूरलेला होता. गांधींनीच डॉ. आंबेडकर यांचे नाव घटनानिर्मितीसाठी सुचवले. प्रत्येक प्रांतातून प्रतिनिधी निवडून घटना समिती तयार झाली. त्यांच्या सुचना स्विकारल्यानंतर एक सलग अशी राज्यघटना अस्तित्वात आली. तिचा मुळ पायाच समाजवाद व धर्मनिरपेक्षता हा आहे. त्यालाच धक्का लावण्याचा प्रयत्न आज केला जात आहे, कारण त्यांच्या मुळ अजेंड्यातील विचारांना त्याचा अडथळा आहे.
देशाने राज्यघटनेचा स्विकार १९४९ मध्ये केला. घटनेप्रमाणे पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५२ मध्ये झाली. या दरम्यानच्या काळात केंद्राने स्थापन केलेला निवडणूक आयोग निवडणुकीची तयारी करत होता. या संपुर्ण काळात काँग्रेसने घटनानिर्मितीसाठी, ती तयार झाल्यानंतर टिकवून ठेवण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे आता कोणी घटनेला, त्यातील मुलतत्वांना धक्का लावायचा प्रयत्न करत असेल तर त्याला प्रतिकार करण्याची, ते थांबवण्याची सर्वात जास्त जबाबदारी काँग्रेसचीच आहे असे केतकर म्हणाले.
मोहन जोशी यांनी प्रास्तविक केले. केतकर यांच्या हस्ते ॲड. रमा सरोदे, विठ्ठलराव गायकवाड, प्रशांत धुमाळ, मिलिंद अहिरे यांना संविधान रक्षक पुरस्कार देण्यात आला. प्रथमेश आबनावे यांनी सुत्रसंचालन केले. नाना करपे यांनी आभार व्यक्त केले.