सत्ताधारी भाजपाकडूनच डीपीच्या प्रश्नावर गोंधळ

By Admin | Updated: March 22, 2017 03:37 IST2017-03-22T03:37:11+5:302017-03-22T03:37:11+5:30

शहराच्या शासनाने मंजूर केलेल्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याचे (डीपी) सादरीकरण सभागृहात करण्यात यावे, अशी मागणी

Confusion with the ruling BJP on the issue of the DP | सत्ताधारी भाजपाकडूनच डीपीच्या प्रश्नावर गोंधळ

सत्ताधारी भाजपाकडूनच डीपीच्या प्रश्नावर गोंधळ

पुणे : शहराच्या शासनाने मंजूर केलेल्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याचे (डीपी) सादरीकरण सभागृहात करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसेच्या सदस्यांकडून महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली जात असताना भाजपाच्या सर्व सदस्यांनी जागेवरून उठून येऊन सभागृहात गोंधळ घातला, यामुळे सभागृहाला आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. महापालिकेत ९८ च्या विक्रमी संख्येने बहुमत मिळविलेल्या सत्ताधारी भाजपावर सभागृह सुरळीतपणे चालविण्याची जबाबदारी असताना त्यांच्याकडून विरोधी पक्षांची मागणी डावलण्यासाठी ही दबावतंत्राची खेळी खेळण्यात आली.
महापालिकेतील विविध समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यासाठी मंगळवारी खास सभा बोलावण्यात आली होती. सभेला सुरूवात होताच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मनसेच्या सदस्यांनी महापौरांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत जमून विकास आराखड्याचे सादरीकरण मुख्यसभेसमोर करण्यात यावे, अशी मागणी करण्यास सुरूवात केली. या विषयावर खुलासा करण्यासाठी सभागृहात आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त उपस्थित नसल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी प्रशासन याबाबतचा खुलासा करेल, असे स्पष्ट करून महापौरांकडून विरोधकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला
जात असतानाच अचानक भाजपाचे सर्व सदस्य जागेवरून उठून महापौरांच्या समोरील जागेत आले. तिथे विरोधी पक्षाचे सदस्य व भाजपाचे सदस्य यांच्यामध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. यामुळे सभागृहाला आखाड्याचे स्वरूप
प्राप्त झाले होते. अखेर
महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार सभागृहात आल्यानंतर त्यांनी याविषयी खुलासा केला. त्यावेळी आंदोलन शांत झाले.
काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘डीपीमध्ये शासनाकडून काय बदल झाले आहेत, याची सभागृहाला माहिती मिळणे आवश्यक आहे. नवीन आलेल्या सदस्यांना त्यांच्या प्रभागातील आरक्षणामध्ये काय बदल झाले आहेत, हे
समजले पाहिजे. त्यामुळे डीपीचे सभागृहात सादरीकरण करण्यात यावे. महापौर मुक्ता टिळक या विरोधी पक्षात होत्या, डीपी सभागृहात सादर व्हावा, अशी त्यांचीच मागणी होती. आता त्यांनाच या मागणीचा विसर पडला आहे.’’
डीपीचा विषय न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे याविषयी सभागृहात त्याचे सादरीकरण करता येणार नाही, असे कुणाल कुमार यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र विरोधकांचे या खुलाशाने समाधान झाले नाही.(प्रतिनिधी)

Web Title: Confusion with the ruling BJP on the issue of the DP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.