कॉँग्रेस महिला अध्यक्षांच्या नियुक्तीवरून गोंधळ
By Admin | Updated: December 27, 2014 05:14 IST2014-12-27T05:14:53+5:302014-12-27T05:14:53+5:30
महिला काँग्रेसच्या नव्या शहराध्यक्षपदावरून गोंधळ सुरू झाला आहे. प्रदेश महिला काँग्रेस

कॉँग्रेस महिला अध्यक्षांच्या नियुक्तीवरून गोंधळ
पुणे : महिला काँग्रेसच्या नव्या शहराध्यक्षपदावरून गोंधळ सुरू झाला आहे.
प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष कमल व्यवहारे यांनी कोणालाही विश्वासात न घेता आपल्या संस्थेतील महिलेची नियुक्ती केल्याचा आरोप माजी अध्यक्ष नीता रजपूत व शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी यांनी केला. तर, नवीन नेतृत्वाला संधी मिळाल्याने भाजप व राष्ट्रवादीतून आलेल्या काही महिला पदाधिकारी दुखावल्या आहेत, असे प्रत्युत्तर व्यवहारे यांनी दिले.
विद्यमान महिला शहराध्यक्ष डॉ. स्नेहल पाडळे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, महिला प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कमल व्यवहारे यांनी पक्षवाढीसाठी काम करण्याऐवजी जातीचे राजकारण केले आहे. लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत त्यांचा प्रभाव दिसून आला नाही. तसेच, शहराध्यक्षपदी अनुभवी महिलेला संधी देण्याऐवजी त्यांनी स्वत:च्या संस्थेतील महिलेला संधी दिली आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे करणार आहे, अशी माहिती रजपूत व तिवारी यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.
याविषयी व्यवहारे म्हणाल्या, गेल्या २५ वर्षांपासून एकनिष्ठपणे पक्षाचे काम करीत आहे. दोन वर्षांपूर्वी मी ख्रिश्चन समाजाच्या महिलेची अध्यक्षपदी निवड केली होती. गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसचे एकनिष्ठपणे काम करणाऱ्या नवनियुक्त अध्यक्ष सोनाली मारणे या प्रदेश सचिव आहेत.
तसेच, विज्ञान व तंत्रज्ञानाची माहिती असलेल्या नव्या नेतृत्वाला संधी दिली आहे. मारणे हिची नियुक्ती करण्यापूर्वी वरिष्ठ महिला कार्यकर्त्यांना विचारणा केली. परंतु, कोणीही पक्षासाठी काम करण्याची जबाबदारी घेण्यास तयार झाले नाही. इतर पक्षातून काँग्रेसमध्ये येऊन माझ्यावर आरोप करण्याचा अधिकार संबंधितांना नाही. (प्रतिनिधी)