चौपदरीकरणाचा संभ्रम
By Admin | Updated: June 18, 2015 23:38 IST2015-06-18T23:38:38+5:302015-06-18T23:38:38+5:30
निगडी ते देहूरोड रस्त्याचे चौपदरीकरण व देहूरोड येथील उड्डाणपूल उभारण्याबाबत १५ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मांडण्यात

चौपदरीकरणाचा संभ्रम
किवळे : निगडी ते देहूरोड रस्त्याचे चौपदरीकरण व देहूरोड येथील उड्डाणपूल उभारण्याबाबत १५ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मांडण्यात आलेली भूमिका व आंदोलकांना दिलेल्या लेखी पत्रात रस्ते विकास महामंडळाने मांडलेली भूमिका यात तफावत आहे. उड्डाणपूल व चौपदरीकरणाच्या कामाबाबत दर वेळी वेगळी माहिती मिळत असल्याने कामाबाबत संभ्रम निर्माण होत असून, काम नक्की कधी सुरू होणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम १० वर्षांपासून रखडल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याबाबत उपाययोजना करण्याबाबत १५ दिवसांपूर्वी देहूरोड ठाण्यात मावळचे आमदार संजय भेगडे, रस्ते विकास महामंडळाचे सर्व संबंधित अधिकारी, सल्लागार, रस्त्याचे ठेकेदार, आयआरबीचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, संबंधित पोलीस अधिकारी व नागरिक यांची संयुक्त बैठक झाली होती. बैठकीत बोलताना रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांनी ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते शिळ फाटा दरम्यान विविध ठिकाणी अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्यावर कामाचे आदेश देण्यात येणार आहेत. देहूरोड ते निगडी दरम्यानच्या सहा किलोमीटर कामासाठी व देहूरोड येथील लोहमार्ग ते गुरुद्वारापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, दोन्ही कामांसाठी एकूण ४१.५४ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे,’ असे स्पष्ट केले होते.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण व देहूरोड येथील लोहमार्ग ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय दरम्यान उड्डाणपूल बांधण्यास दिरंगाई होत चालली आहे. त्यामुळे रस्ते विकास महामंडळ व शासन यांच्या निषेधार्थ मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी आत्मदहन आंदोलन करण्याचे रीतसर पत्र दिले. त्यानंतर ह्यमरारविमह्णने मंचाला दिलेल्या लेखी पत्रातील उत्तराने चौपदरीकरणाबाबत व उड्डाणपूल बांधकामाचे काम सुरू होण्याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण असून, सदर पत्रानुसार निगडी ते देहूरोड मार्गाचे चौपदरीकरण करण्याबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीबाबत व कामाच्या आदेशाबाबतचा काहीही उल्लेख केला नसून, निविदेबाबत कार्यवाही सुरू असून, सदर कार्यवाहीनंतर कामे सुरू होणार असल्याचे नमूद केले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडे पत्र दिले असून, काही अवधी आवश्यक असल्याचे लेखी दिले आहे.
महामंडळाकडून दरवेळी वेगवेगळी भूमिका मांडण्यात येत असल्याने देहूरोडच्या नागरिकांत कामाच्या प्रारंभाबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला असून, उड्डाणपूल व चौपदरीकरण काम कधी सुरू होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)