वेल्हा-तोरणा रस्त्याचे कॉँक्रिटीकरण
By Admin | Updated: June 23, 2014 01:36 IST2014-06-23T01:36:18+5:302014-06-23T01:36:18+5:30
तोरणा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉँक्रिटीकरणाच्या कामास अखेर सुरुवात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपअभियंता व्ही. एच. पवार व कनिष्ठ अभियंता दीपक हरणे यांनी दिली.

वेल्हा-तोरणा रस्त्याचे कॉँक्रिटीकरण
मार्गासनी : तोरणा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉँक्रिटीकरणाच्या कामास अखेर सुरुवात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपअभियंता व्ही. एच. पवार व कनिष्ठ अभियंता दीपक हरणे यांनी दिली.
शासनाने राज्यातील किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत शासन निर्णय दि. १९-०७-२०११ नुसार किल्ले मालिका विकास प्रकल्प मंजूर केला आहे. त्यामध्ये तोरणा (प्रचंडगड) किल्ल्याचा समावेश केला आहे.
या कामासाठी राज्य शासनाने पर्यटन विकास महामंडळाच्या अंतर्गत सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वेल्हे तहसील कार्यालयापासून ते २२०० मी. लांबीचा भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन सिमेंट काँक्रीट व डांबरीकरण करण्यात येणार आहे. तोरणा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असताना ते काम पायथ्यापासून सुरू करण्यासाठी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना निवेदन देऊन काही राजकीय मंडळींनी या कामास विरोध केला होता. त्यामुळे काम बंद होते.
वेल्हे ग्रामपंचायतीकडून या रस्त्याचे काँक्रिटीकरण व्हावे, असा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित अधिकारी व ग्रामस्थ यांची बैठक घेऊन रस्त्याचे काम किल्ल्याच्या पायथ्याकडून सुरू करावे व काँक्रिटीकरण करावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
नुकतेच उपअभियंता व्ही. एच. पवार व कनिष्ठ अभियंता दीपक हरणे यांनी तोरणा किल्ल्याची पाहणी केली. पुढील टप्प्यात पर्यटकांसाठी शौचालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तसेच सुसज्ज विश्रामगृह इत्यादी गोष्टी करण्यात येणार आहेत, तर राजगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम लवकरात-लवकर सुरू करणार असल्याची माहिती उपअभियंता पवार यांनी दिली. यामुळे तालुक्यात पर्यटनास चालना मिळणार असून, युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. किल्ल्याचा रस्ता काँक्रिटीकरण व्हावा यासाठी प्रदीप मरळ, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, जिल्हा राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष दत्ता देशमाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शंकर भुरूक, वेल्ह्याचे सरपंच संतोष मोरे, उपसरपंच सुनील राजीवडे, प्रकाश पवार, संदीप नगिने, सुनील भुरूक, जगन्नाथ भुरूक यांनी पाठपुरावा केला होता. (वार्ताहर)