कलाकृतीची पूर्णता हेच कलाकाराच्या कलेचं मुख्य फलित : नागनाथ मंजुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:15 IST2021-08-24T04:15:43+5:302021-08-24T04:15:43+5:30
पुणे : माध्यम कोणतेही असो, ज्या वेळी एखादी कलाकृती पूर्ण बनते, तेच त्या कलाकाराच्या कलेचे मुख्य फलित असतं. कलेचं ...

कलाकृतीची पूर्णता हेच कलाकाराच्या कलेचं मुख्य फलित : नागनाथ मंजुळे
पुणे : माध्यम कोणतेही असो, ज्या वेळी एखादी कलाकृती पूर्ण बनते, तेच त्या कलाकाराच्या कलेचे मुख्य फलित असतं. कलेचं माध्यमांतर होणे ही वेगळी बाब आहे. म्हणूनच एक साहित्यप्रेमी म्हणून सर्वप्रथम या कलाकृतीचा आस्वाद घ्यायला अधिक आवडेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.
सुशील गायकवाड लिखित ‘झेंगट’ या कादंबरीच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते अध्यक्षस्थानी बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आणि राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे उपस्थित होते.
आवटे म्हणाले, ‘झेंगट’मध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे जीवन, तत्कालीन कृषी शिक्षण पद्धती व त्याचे फलित व त्यातील त्रुटी, कॉलेजातील राजकारण, समाजकारण, प्रादेशिकवाद याचे सांगोपांग चित्रण झालेले आढळते म्हणून ही कादंबरी वाचकाच्या मनाला भिडते.
सदानंद बोरसे यांनी ‘झेंगट’ ही कादंबरी ‘नॉवेल आॅफ फॉर्मशन’ म्हणजे जडणघडणीच्या काळात मोडणारी असून, एक अनवट आयुष्य चित्रित करणारी असल्याचे सांगितले.
प्रकाश मगदूम यांनी या कादंबरीमध्ये एखादी वेबसिरीज किंवा चित्रपट निर्माण करण्याची क्षमता असल्याचे सांगितले.
सुशील गायकवाड यांनी कादंबरी लेखनामागील भूमिका स्पष्ट केली. कृषी महाविद्यालयीन जीवनावर मराठी साहित्यात क्वचितच लिखाण झालेले आढळते. तसेच या जीवनाला संघर्षाचे पदर होते. कॉलेजातील शिक्षणव्यवस्था, राजकारण, जातीयता, नैराश्य, विफलता, प्रेम, मैत्री असे अनेक विविध पापुद्रे या संघर्षाला होते. ते व्यक्त करावेसे वाटल्याने ही कादंबरी लिहिल्याचे ते म्हणाले.
शशी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संग्राम गायकवाड यांनी आभार मानले.
--------------------------------------------------------