ऐतिहासिक काँग्रेस भवनाला ७५ वर्षे पूर्ण
By Admin | Updated: January 23, 2015 00:19 IST2015-01-23T00:19:39+5:302015-01-23T00:19:39+5:30
अनेक महत्त्वाच्या घटना-घडामोडींचे साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक ‘काँगेस भवना’ला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

ऐतिहासिक काँग्रेस भवनाला ७५ वर्षे पूर्ण
पुणे : महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून मनमोहनसिंग, राहुल गांधी आदी दिग्गज नेत्यांचा सहवास लाभलेल्या... अनेक महत्त्वाच्या घटना-घडामोडींचे साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक ‘काँगेस भवना’ला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने २५ ते ३१ जानेवारीदरम्यान अमृत महोत्सवी सप्ताह शहरात साजरा केला जाणार आहे.
महात्मा गांधी यांच्या इच्छेनुसार देशातील प्रत्येक शहरात काँग्रेस भवन उभारण्यात आले. त्यानुसार पुण्यात एक एकर जागेवर प्रशस्त काँग्रेस भवन २६ जानेवारी १९४० रोजी उभारण्यात आले. या वास्तूला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांची माहिती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय छाजेड व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी दिली.
महात्मा गांधींनी पुण्यातील काँग्रेस भवनाच्या उद्घाटनानिमित्त ‘यह मकान सच्चे सेवकों का याने खिदमतगारों का बने’ अशा शुभेच्छा दिल्या होत्या. त्याची फलकावर नोंद करून या इमारतीचे उद्घाटन झाले होते. काँग्रेसचे नेते काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, शंकरराव मोरे यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून ही वास्तू उभी राहिली.
शहरामध्ये २५ जानेवारी रोजी सकाळी ७५ ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली जाणार आहेत. सायंकाळी काँग्रेस भवनामध्ये ऐतिहासिक घटनांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होईल. २६ जानेवारी रोजी सकाळी ध्वजवंदन होईल. सायंकाळी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्रेहमेळाव्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. २७ जानेवारीला शहरातून प्रभात फेरी काढण्यात येईल. तसेच, ७५ अपंग सैनिकांचा सत्कार केला जाईल. २९ जानेवारी रोजी स्वातंत्र्यसैनिक कुटुंबीयांचा सन्मान केला जाईल. या वेळी काँग्रेसची मान्यवर नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित मिरवणूक काढली जाईल. ३१ जानेवारीला ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेने याचा समारोप होईल, अशी माहिती छाजेड यांनी दिली.(प्रतिनिधी)
बालक्रांतिकारक दाभाडे यांचे बलिदान
काँग्रेस भवन येथे बाल क्रांतिकारक हुतात्मा नारायण दाभाडे याने हातात घेतलेला तिरंगा खाली टाकावा म्हणून इंग्रजांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या बलिदानाने काँग्रेस भवन पुनीत झाले आहे. या आठवणीलाही उजाळा दिला जाणार आहे.