आधी कामे पूर्ण करा; मगच टोल सुरू करा
By Admin | Updated: February 14, 2017 01:49 IST2017-02-14T01:49:13+5:302017-02-14T01:49:13+5:30
चाळकवाडी येथील प्रस्तावित करण्यात आलेल्या टोलनाक्यावर टोल सुरू करण्यास बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असल्याने सर्व समस्या

आधी कामे पूर्ण करा; मगच टोल सुरू करा
पिंपळवंडी : चाळकवाडी येथील प्रस्तावित करण्यात आलेल्या टोलनाक्यावर टोल सुरू करण्यास बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असल्याने सर्व समस्या सोडवा आणि मगच टोल सुरु करा, अशी ठोस भूमिका घेतल्याने व सर्वच राजकीय पक्षांनी या प्रश्नामध्ये उडी घेतल्यामुळे येथील टोलनाका केव्हा सुरु होणार याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या बाबत ग्रामस्थांनी आळेफाटा येथील सावतामाळी मंदिरात बैठक घेतली.
पुणे-नाशिक महामार्गाचे राजगुरुनगर ते सिन्नर या दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. या महामार्गाच्या एकूण १३८ किलोमीटरपैकी १०५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविल्यामुळे संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा आणि जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी येथील टोलनाका शनिवार (दि.११) पासून सुरु करण्यात येणार होता. परंतु येथील बाधित शेतकऱ्यांनी आणि आळे येथील ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न न सुटल्यामुळे उपविभागीय अधिकारी व आयएलएफएसचे अधिकारी यांनी रघुनाथ लेंडे, संतोष घोटणे, प्रदीप चाळक, बाजीराव लाड, प्रसन्ना डोके आणि बाधित शेतकरी व आळे ग्रामस्थांबरोबर आळेफाटा येथील सावतामाळी मंदिरात बैठक घेतली. या बैठकीत बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, आळे येथील सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात यावे, पिंपळवंडी येथील स्मशानभूमीचे काम करा आणि मगच टोल आकारणी करण्यास सुरुवात करा अशी ठोस आणि आक्रमक भूमिका घेतली. या विषयात राजकीय पक्षांनी उडी घेतली असल्यामुळे या विषयाला राजकीय वळण लागले असल्यामुळे हा टोलनाका केव्हा सुरु होणार याबाबत शंका निर्माण झाली आहे.