तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचतच नाहीत
By Admin | Updated: January 7, 2015 22:57 IST2015-01-07T22:57:50+5:302015-01-07T22:57:50+5:30
शहरातील महाविद्यालयांमध्ये काही ठिकाणी तक्रारपेट्या आहेत,

तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचतच नाहीत
बारामती : शहरातील महाविद्यालयांमध्ये काही ठिकाणी तक्रारपेट्या आहेत, तर काही महाविद्यालयांमध्ये तक्रारपेट्या नाहीत. विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या तक्रार निवारणासाठी महाविद्यालयातील महिला शिक्षकांची समिती निर्माण करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. मात्र, अशी समिती आपल्या महाविद्यालयामध्ये आहे, हेच विद्यार्थिनींना माहीत नाही. तक्रारपेटींच्या या माध्यमातून केल्या जाणाऱ्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचतच नाहीत. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत ही बाब उघड झाली.
बारामती शहरात परिसरातील अनेक गावांमधून विद्यार्थिनी येत असतात. विशेषत: ग्रामीण भागातून १५ ते २० किमी प्रवास करून विद्यार्थिनी महाविद्यालयांमध्ये पोहोचतात. त्यांना प्रवासात आणि महाविद्यालयीन परिसरात छेडछाडीच्या प्रकाराला सामोरे जावे लागते. तत्कालीन ग्रामीण पोलीस अधीक्षक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी महाविद्यालयीन युवतींच्या सुरक्षिततेसाठी महाविद्यालयांमध्ये तक्रारपेट्या बसवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर विद्यार्थिनींच्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी सुरुवात झाली. अनेक महाविद्यालयांमधून या पेट्या ‘जैसे थे’ आहेत. तर, काही महाविद्यालयांमधून या पेट्या गायब झाल्याचे वास्तव समोर आले आहे. करिअर घडवण्यासाठी महाविद्यालयात विद्यार्थिनी प्रवेश घेतात. मात्र, असुरक्षित जीवन वाट्याला आल्यावर शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थिनी आहेत. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात ठेवलेली तक्रारपेटी महत्त्वाची आहे.
बारामती शहरातील महाविद्यालयात बाहेरचीच ‘टवाळ’ मुले राजरोसपणे फिरतात. गेटवर सुरक्षारक्षकांकडून कोणत्याही प्रकारची नोंद ठेवण्यात येत नाही. महाविद्यालयाच्या बाहेरची एखादी व्यक्ती आल्यास सुरक्षारक्षकांकडून त्यांची साधी विचारपूसही होत नाही. त्यामुळे ‘रोडरोमिओं’चे चांगलेच फावते. याबाबत विद्यार्थिनींनी महाविद्यालय प्रशासनास तक्रारी केल्या आहेत. मात्र, या ‘टवाळां’च्या तक्रारी आल्यावरच कारवाई केली जाते. तसेच, महाविद्यालयामध्ये असे अनेक टवाळखोर येतात. या संदर्भात प्राचार्य चंद्रशेखर मुरुमकर यांनी सांगितले, की विद्यापीठाच्या नियमानुसार प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थिंनींच्या समस्या मांडण्यासाठी एक ‘महिला दक्षता समिती’ स्थापन करण्यात येते. तशी समिती या महाविद्यालयात आहे. परंतु अशी समिती आपल्या महाविद्यालयात आहे, हेच विद्यार्थिनींना माहीत नाही. तसेच, या समितीतील सदस्य कोण आहेत, हेही माहीत नसल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, सोमेश्वरनगर येथील भारत खोमणे, सचिव यांनी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाअंतर्गत येणाऱ्या सायन्स
कॉलेज, पॉलिटेक्निकल कॉलेज व इंजिनिअरिंग कॉलेज यामधून मुलींसाठी तर तक्रार निवारण पेट्या आहेत. शिवाय मुलांसाठीही आहेत. यामुळे मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण कमी झाले आहे. लवकरच सोमेश्वर विज्ञान ज्युनिअर कॉलेजसाठीही तक्रार निवारण पेट्या बसविणार येणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
४विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातही ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती आहे. महाविद्यालयास एकूण आठ गेट आहेत. मात्र, फक्त एकाच गेटवर सुरक्षारक्षक असतात. त्यामुळे महाविद्यालयात बाहेरचे टवाळखोर मुलींची छेडछाड करतात. अश्लील टोमणे मारले जातात. विद्यार्थिनींचे मोबाईल क्रमांक मिळवूनही त्यांना त्रास दिला जातो, असे विद्यार्थिनींनी सांगितले. भीती आणि संकोचामुळे विद्यार्थिनी याबाबत शिक्षकांना सांगत नाहीत. तसेच, या महाविद्यालयात तक्रारपेटी नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे होणाऱ्या त्रासाबाबत कोणाला सांगावे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. काही मुली धाडसाने शिक्षकांकडे तक्रारी करतात. त्यावर शिक्षकही कारवाई करतात. मात्र, हे प्रमाण खूपच कमी आहे.
४माळेगाव इंजिनिअर कॉलेजमध्ये तर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी तक्रारपेटी बसविण्यात आली आहे. तर, माळेगाव कॉलेजच्या वसतिगृहामध्ये फक्त विद्यार्थिनींसाठी तक्रारपेटी बसविण्यात आली आहे. मात्र, यात तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाण अत्यल्प आहे.
४सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे यांनी मुलींच्या छेडछाडीचे काही प्रकार घडल्यानंतर महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीने तीन वर्षांपूर्वी तक्रारपेट्या बसविण्यात आल्याची माहिती दिली. यामुळे छेडछाडीला आळा बसला. गेल्या दोन वर्षांत अशा तक्रारींचे प्रमाण नगण्य झाले आहे, असे त्यांनी सांगितले.