आयटी कंपन्यांमध्ये तक्रार निवारण समिती
By Admin | Updated: February 14, 2017 02:08 IST2017-02-14T02:08:16+5:302017-02-14T02:08:16+5:30
कामाच्या व्यापामुळे सध्या तरुण कुटुंबात कमी आणि आयटी कंपन्यांमध्ये अधिक वेळ घालवतात. कंपन्यांनी त्यांच्या सुरक्षेची हमी घेतलीच पाहिजे.

आयटी कंपन्यांमध्ये तक्रार निवारण समिती
पुणे : कामाच्या व्यापामुळे सध्या तरुण कुटुंबात कमी आणि आयटी कंपन्यांमध्ये अधिक वेळ घालवतात. कंपन्यांनी त्यांच्या सुरक्षेची हमी घेतलीच पाहिजे. ज्या कंपन्यांमध्ये तक्रार निवारण समित्या नाहीत त्यांनी त्या त्वरित स्थापन कराव्यात, अशा स्पष्ट सूचना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिल्या आहेत.
हिंजवडीमधील इन्फोसिस कंपनीची अभियंता रसिला ओपी हिच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांची सुरक्षा’ या विषयावर चर्चासत्र आयोजिले होते. या वेळी महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स कॉर्पोरेशनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जगजित सिंग, पुण्याचे सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त विश्वास पांढरे, पी. आर. पाटील, दीपक साकोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. कंपन्यांमधील सुरक्षेसाठी पोलिसांची २४ तास मदत उपलब्ध आहे. मात्र अंतर्गत सुरक्षेसाठी कंपन्यांनी यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे ही कंपन्यांची जबाबदारी आहे. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांना जेवढा वेळ कुटुंबाला द्यावा लागतो त्यापेक्षा अधिक काळ त्या कंपन्यांमध्ये काम करतात.(प्रतिनिधी)