पेस्ट कंट्रोल व्यावसायिकावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 13, 2015 23:47 IST2015-12-13T23:47:25+5:302015-12-13T23:47:25+5:30
यमुनानगर येथे घरात केलेल्या पेस्ट कंट्रोलमुळे श्वास गुदमरून युवक-युवतीचा गुदमरून मृत्यू झाला होता. पेस्ट कंट्रोल चालकाने घरात पेस्ट कंट्रोल करताना प्राणघातक औषधींचा

पेस्ट कंट्रोल व्यावसायिकावर गुन्हा दाखल
पिंपरी : यमुनानगर येथे घरात केलेल्या पेस्ट कंट्रोलमुळे श्वास गुदमरून युवक-युवतीचा गुदमरून मृत्यू झाला होता. पेस्ट कंट्रोल चालकाने घरात पेस्ट कंट्रोल करताना प्राणघातक औषधींचा वापर प्रमाणात केला नाही. तसेच या व्यवसायाचे त्याने कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही. व्यवसायाचा शासकीय परवाना नाही, असे पोलिसांना तपासात आढळून आल्याने त्यांनी पेस्ट कंट्रोल करणारे व्यावसायिक लक्ष्मण जगन्नाथ वाळुंज (रा. कोथरूड, पुणे) याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निगडीतील यमुनानगरमध्ये ३१ आॅक्टोबर रोजी शंकर लगडिया यांच्या घरी पेस्ट कंट्रोलचे काम करण्यात आले होते. त्याच दिवशी सायंकाळी लगडिया यांचा मुलगा धवल लगडिया (वय २४) त्याची मैत्रीण मंदिरा रामलाल चौधरी (वय २६, रा. तळेगाव) हिला घरी घेऊन आला होता. या वेळी घरात दोघे एकटेच होते. काही वेळाने दोघांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. मात्र, उपचारादरम्यान धवलचा त्याच दिवशी, तर मंदिराचा दुसऱ्या दिवशी सकाळी मृत्यू झाला होता.
तपासाधिकारी मधुकर थोरात यांना पेस्ट कंट्रोल व्यावसायिकाने घरात पेस्ट कंट्रोल करताना जी प्राणघातक औषधी, रसायने वापरली, ती प्रमाणापेक्षा जास्त वापरली असल्याचे आढळून आले. हा व्यवसाय टाकण्यासाठी कृषी पदवीचे शिक्षण गरजेचे आहे, प्रशिक्षण घेणे गरजेचे असून, शासनाची परवानगी असणे गरजेचे आहे. त्याने कुठल्या प्रकारचे शिक्षण घेतले नसून, शासनाची परवानगीही घेतली नाही. बेकायदेशीर व्यवसाय करून मृत्यूस जबाबदार
धरले आहे. (प्रतिनिधी)