पुणे : केंद्र सरकारच्या विकसित भारत या पुस्तिकेचे वाटप मतदारांना केल्यावरून काँग्रेसने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. कर्वेनगर परिसरात या पुस्तिकेचे वाटप करण्यात येत होते.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रतिनिधी रमेश अय्यर यांनी ही तक्रार केली. यावेळी शहर काँग्रेसचे सरचिटणीस चेतन अगरवाल, सुरेश कांबळे उपस्थित होते. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत केंद्र, राज्य सरकार अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या विकासकामासंदर्भात काहीही मजकूर किंवा फोटो कोणत्याही स्वरूपात मतदारांना आकर्षित करण्यासाठी दाखवण्यास मनाई आहे. तरीही भाजपचे कार्यकर्ते मतदारांना केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून भारत विकसित झाल्याचे दाखवणारी पुस्तिका वाटत होते. इतकेच नव्हे तर पुस्तिका हातात देताना भाजपला मतदान करा, असेही सांगत होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, पुस्तिका वाटपास प्रतिबंध करावा व संबधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी चौकशीचे आश्वासन दिले.