दिवळेत मतदान न करू दिल्याची तक्रार
By Admin | Updated: February 23, 2017 02:21 IST2017-02-23T02:21:44+5:302017-02-23T02:21:44+5:30
दिवळे (ता. भोर) येथील मतदान संपण्यास थोडा अवधी असतानादेखील मतदान प्रक्रियेचा वेळ

दिवळेत मतदान न करू दिल्याची तक्रार
नसरापूर : दिवळे (ता. भोर) येथील मतदान संपण्यास थोडा अवधी असतानादेखील मतदान प्रक्रियेचा वेळ संपल्याने, उशिरा आलेल्या ग्रामस्थांना मतदान करता येणार नाही, असे मतदार अधिकाऱ्याने सांगून काही मतदारांना मतदान करू दिले नसल्याची तक्रार दिवळे मतदान केंद्रावरील मतदान प्रतिनिधींनी केली आहे.
दिवळे येथील मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी मतदानाची वेळ संपली असल्याने मतदान करता येणार नाही, असे उपस्थित मतदारांना सांगितले. यावेळी रांगेत असलेल्या ग्रामस्थांना मतदान करण्यासाठी मतदानाच्या खोलीत मतदानासाठी घेतले गेले. परंतु, याच वेळेत मतदानासाठी खोलीबाहेर काही नागरिक आले होते. त्यांना वेळ संपली असल्याने त्यांना मतदान करता येणार नाही, असे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याने सांगितल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.
यावेळी मतदान खोलीत मतदान करणाऱ्या ग्रामस्थांनी मतदान खोली बाहेरील मतदारांनाही मतदान करू द्यावे, अन्यथा आम्हीही मतदान करणार नाही, असा पवित्रा घेऊन मतदान केले नाही. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत मतदान प्रतिनिधी रामचंद्र ओंबळे यांनी माहिती देताना सांगितले, दिवळे येथील मतदान केंद्रावर सकाळी उशिराच मतदान सुरू झाले व सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी केंद्रप्रमुख एस. पी. सरवदे यांनी मतदान बंद करत आलेल्या मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश नाकारला, यावर आम्ही सर्व पक्षाच्या मतदान प्रतिनिधींनी हरकत घेत साडेपाच वाजेपर्यंत आलेल्या मतदारांना मतदान करू द्यावे, असे सांगितले. मात्र, माझ्या घड्याळात साडेपाच वाजले आहेत. त्यामुळे यापुढील मतदार मतदान करू शकत नाहीत, अशी भूमिका सरवदे यांनी घेतली. आम्ही त्यांना विनंती केली, मात्र त्यांनी त्यांची दखल घेतली नाही. तसेच यावेळी एक उमेदवाराच्या पतींनी त्यांना फोन करून
मतदान सुरू ठेवण्याची विनंती केली, त्यांनादेखील मी कायद्यानुसार साडेपाच वाजता मतदान बंद केले असल्याचे सांगून त्यांच्याशी
बोलणे टाळले.
यानंतर आम्ही सर्वपक्षीय मतदान प्रतिनिधींनी आठ जण या घटनेचा निषेध करत मतदान केंद्रामधून बाहेर आलो.या झालेल्या वादाच्या काळात या ठिकाणी पोलिसांना बोलावण्यात आले होतेल. त्यांनी मतदान केंद्राबाहेर जमलेला जमाव पांगवला. यावेळी पोलिसांनीदेखील अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार रामचंद्र ओंबळे यांनी केली आहे. (वार्ताहर)
मी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत रांगेमध्ये असलेल्या १९ जणांना स्लिपा दिल्या होत्या. मात्र, मतदान प्रतिनिधींनी यानंतरही आलेल्या काही मतदारांना मतदान करु देण्याचा आग्रह धरला. मात्र, नियमानुसार तसे करता येणार नसल्याचे त्यांना सांगितल्यावर त्यांनी माझ्याशी वाद घालून रांगेमधील मतदारदेखील मतदान करणार नाहीत. असा पवित्रा घेऊन रांगेमधील सोळा जणांना घेऊन मतदान केंद्राबाहेर गेले. आम्ही सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांनी यानंतर त्यांची बराच वेळ वाट पाहिली. परंतु, कोणी आले नाही. तिथे उपस्थित दोन मतदान प्रतिनिधींची स्वाक्षरी घेऊन मतदान यंत्र बंद करण्यात आले. याबाबत मी काही बेकायदेशीर केले नाही.
- एस. पी. सरवदे, मतदान केंद्रप्रमुख