फिर्यादीच निघाला सूत्रधार!
By Admin | Updated: January 25, 2017 01:43 IST2017-01-25T01:43:46+5:302017-01-25T01:43:46+5:30
अवसरी बुद्रुक गावाच्या हद्दीत मंचर-पारगाव रस्त्यावर २५ लाख रुपयांची रक्कम लुटून नेल्याच्या घटनेला कलाटणी मिळाली आहे.

फिर्यादीच निघाला सूत्रधार!
मंचर : अवसरी बुद्रुक गावाच्या हद्दीत मंचर-पारगाव रस्त्यावर २५ लाख रुपयांची रक्कम लुटून नेल्याच्या घटनेला कलाटणी मिळाली आहे. या घटनेची फिर्याद पोलिसांत देणारा कर्मचारीच मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले आहे.
या घटनेतील अटक केलेल्या दोन आरोपींच्या मदतीने कॅश लुटण्याचा प्रकार या सूत्रधाराने केला. या प्रकरणी कंपनीचा कर्मचारी विजय शिवाजी ढेरे याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
शिरोली बोरी (ता. जुन्नर) येथील एटीएममध्ये भरण्यासाठी २५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या दोन ठेकेदारांकडून रांजणी येथील जंगलात मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी २५ लाख रुपये लुटले होते. मोटारसायकलवरून पळून जाणाऱ्या चोरट्यांच्या दुचाकीची अवसरी बुद्रुक येथील रवींद्र विठोबा टाव्हरे यांच्या मोटारसायकलला धडक बसून चोरट्यांसह रवींद्र टाव्हरे जबर जखमी झाले. चोरट्यांची २५ लाख रुपये असलेली बॅग रस्त्यात पडली. स्थानिक ग्रामस्थांनी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना घडलेला प्रकार भ्रमणध्वनीवरून कळविला. पोलीस निरीक्षक गोडसे यांनी चोरट्यांचा पाठलाग केला होता. चोरटे गंभीर जखमी असल्याने व स्थानिक रवींद्र टाव्हरे यांना रोख रकमेसह मंचर पोलीस ठाण्यात आणून सरकारी दवाखान्यात उपचारांसाठी नेण्यात आले. दरम्यान, या संदर्भात लॉजी कॅश कंपनीचा कर्मचारी विजय शिवाजी ढेरे याने मंचर पोलिसांत
फिर्याद दिली. पोलिसांनी अजय जनार्दन गायकवाड (वय ३२, रा. धाणोरी, शिवणगाव जि. नांदेड)
व प्रकाश लक्ष्मण पवार
(रा. रांझणी देवाची, ता. माढा, जि. सोलापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गंभीर जखमी झाल्याने दोन्ही आरोपींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले. विजय ढेरे याला पोलिसांनी अटक केली असून, त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस निरीक्षक सुनील गोडसे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)