छतावर पडणारे पाणी होणार संकलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 04:46 IST2016-05-25T04:46:58+5:302016-05-25T04:46:58+5:30
यंदाच्या पावसाळ््यापासून महापालिकेच्या ७४ इमारतींवरील ६ लाख चौरस फुट छतावर पडणारे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे संकलित करून जमिनीत जिरविण्याच्या महत्त्वाकांक्षी

छतावर पडणारे पाणी होणार संकलित
पुणे : यंदाच्या पावसाळ््यापासून महापालिकेच्या ७४ इमारतींवरील ६ लाख चौरस फुट छतावर पडणारे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे संकलित करून जमिनीत जिरविण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेस मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या कामासाठी पावणेदोन कोटी रुपयांचा खर्च येणार असून जुलै २०१६ पर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.
रेनवॉटर हार्वेस्टिंग अंतर्गत इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी गोळा करून ते पाइपद्वारे बोअरवेलमध्ये किंवा खोलवर खड्ड्यात सोडले जाते. शहरामध्ये इमारतींवर ही यंत्रणा बसविणाऱ्या सोसायट्यांना मिळकतकरामध्ये पालिकेकडून सवलत देण्यात येते. मात्र सोसायट्या तसेच नागरिकांकडून या योजनेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेसाठी पुढाकार घेऊन नागरिकांपुढे आदर्श घालून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेची मुख्य इमारत तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या ७४ इमारतींवर हा प्रकल्प उभारण्यास स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली.
येत्या जूनअखेरपर्यंत शहरात ७४ ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. इमारतींच्या छतावर पडणारे पाणी गोळा करणे, त्याचे शुद्धीकरण करणे, ते पाणी बोअरवेलमध्ये सोडण्यासाठी व्यवस्था करणे आदी कामे याअंतर्गत केली जाणार आहेत.
शहरामध्ये मागील वर्षी सरासरीच्या निम्माच पाऊस झाल्याने यंदा पुणेकरांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेत. शहराला गेल्या ८ महिन्यांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांना पाणी कमी पडत असल्याने त्यांनी बोअर घेतले आहेत. बोअरच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने पाण्याची भूजलपातळी वेगाने घटत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जलपुनर्भरणाच्या कामात सहभाग घ्यावा, यासाठी पालिकेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.