‘बर्ड फ्लू’ग्रस्तांना राज्यात ६६ लाखांची भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST2021-02-05T05:01:22+5:302021-02-05T05:01:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बर्ड फ्लू आजारामुळे ज्यांच्या कोंबड्या किंवा अन्य पक्षी नष्ट करावे लागले अशा बाधितांना राज्य ...

‘बर्ड फ्लू’ग्रस्तांना राज्यात ६६ लाखांची भरपाई
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बर्ड फ्लू आजारामुळे ज्यांच्या कोंबड्या किंवा अन्य पक्षी नष्ट करावे लागले अशा बाधितांना राज्य पशुसंवर्धन विभागाने ६६ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून दिले. राज्यात विविध ठिकाणी जानेवारीपासून आतापर्यंत ७२ हजार कोंबडा नष्ट करण्यात आल्या. पोल्ट्री फार्म चालकांना याचा सर्वाधिक फटका बसला.
राज्य सरकारने पशुसंवर्धन विभागाला अशा मदतीसाठी १ कोटी ३० लाख रुपये उपलब्ध करून दिले. स्थलांतरीत पक्ष्यांमधून हा आजार कावळे, बदके यांच्यात पसरला. त्यांच्याकडून पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना त्याची लागण झाली. नियमाप्रमाणे अशी बाधा झालेल्या ठिकाणापासूनच्या १ किलोमीटर परिघातील पोल्ट्री फार्ममधील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात आले. अंडी व अन्य पशुखाद्यही जमिनीत खोलवर पुरून टाकण्यात आले.
या प्रक्रियेत राज्यात ५० हजार अंडी व ६४ हजार किलो पशुखाद्य नष्ट करण्यात आले. नष्ट करण्यात आलेल्या आठ आठवडे वयापर्यंतच्या अंडी देणाऱ्या प्रतिकोंबडीला २० रुपये, आठ आठवड्यांनंतरच्या अंडी देणाऱ्या प्रतिकोंबडीस ९० रुपये, प्रति अंडी ३ रुपये, कुक्कुट पक्षी खाद्य प्रति किलोला १२ रुपये, सहा आठवडे वयाच्या प्रति बदकाला ३५ रुपये, सहा आठवड्यानंतरच्या बदकाला १३५ रुपये नुकसानभरपाई देण्यात येते.