गंडवागंडवी सामान्य माणसांची

By Admin | Updated: May 20, 2015 01:05 IST2015-05-20T01:05:26+5:302015-05-20T01:05:26+5:30

भावनिक आवाहन करुन सामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचे वाढते प्रकार शहर व परिसरात होत असून नागरिक त्याला बळी पडत आहेत.

The common man of Gandhwandwadi | गंडवागंडवी सामान्य माणसांची

गंडवागंडवी सामान्य माणसांची

पुणे : भावनिक आवाहन करुन सामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचे वाढते प्रकार शहर व परिसरात होत असून नागरिक त्याला बळी पडत आहेत. आर्थिक लुबाडणुकीचा मार्ग फसवेगिरी करणाऱ्यांच्या चांगलाच अंगवळणी पडल्याचे चित्र आहे. या फसवणुकीबाबत आजवर फारशा तक्रारी न झाल्याने या मंडळींचा गोरखधंदा तेजीत आहे.

फिर्याद नसल्याने फसवे सोकावले
४अपंग नसताना तसा बहाणा करुन भीक मागणे, तृतियपंथीय असल्याचा अभिनय करुन पैसे गोळा करणे, जवळचा आप्त गंभीर आजारी असल्याची बतावणी करणे, एखाद्या पुरुषाला वेश्यागमनासाठी प्रवृत्त करुन निर्जन ठिकाणी नेऊन साथीदारांच्या सोबत लुबाडणे, मोबाईलवर दिलेल्या मिस्ड कॉलमुळे त्या नंबरवर कॉल करणाऱ्यास एखाद्या महिलेचा नंतर पुरुषी दमदाटीचा आवाज येऊन ब्लॅकमेल करणे, असे अनेक प्रकार बोकाळले आहेत. पोलिसांकडे अशा गोष्टींची दाद किंवा फिर्याद नसल्याने या फसवणुकी चव्हाट्यावर येत नाहीत. त्यामळे फसवणूक करणारे सोकावले आहेत.

नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर किंवा तत्सम आपत्तींनंतर मदतीचे आवाहन करीत पत्र्याचे डबे फिरविले जातात. कोणत्याही व्यक्तीस किंवा सामाजिक संघटनेला नागरिकांकडून अशा प्रकारे मदत गोळा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी आवश्यक असते. मदत मागणाऱ्यांकडे अशी परवानगी असते काय, याची चौकशी केली जात नसल्याने किंवा या डब्यांवर संमती दर्शक सरकारी चिन्ह असावे असा विचार झालेला नसल्याने मदतीच्या नावाखाली काही मंडळी स्वत:चे उखळ पांढरे करुन घेत असल्याचा संशय जाणकारांत आहे.
लोकसंख्येची दाटी शहरात झाल्यानंतर फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार रोजच घडत आहेत. ज्येष्ठवयीन महिलांना पुढे खून झाला आहे, आम्ही पोलीस आहोत तुमचे दागिने काढून रुमालात ठेवा, असे सांगणारे हातचलाखीने दागिने घेऊन फसवणूक करतात. दुपारी पुरुष घरात नसताना महिलांना दागिने पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने फसविणारे आजही सक्रिय आहेत. जमीन खरेदी-विक्री, विवाहाचे आमिष दाखवून फसवणूक, जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांची होणारी फसवणूक, आयटीच्या जमान्यात मधाळ आवाजात डेबीट कार्डचा नंबर विचारणाऱ्यांकडून होणारी आॅनलाईन खरेदी व फसवणूक अशा फसवेगिरीच्या नेहमीच्या मार्गांखेरीज अन्य काही मार्गही फसवणुकीसाठी अवलंबले जात आहेत.
या फसवणुकीत एका व्यक्तीचे होणारे नुकसान नगण्य असले तरी घाऊक प्रमाणात फसवणूक केली जात असल्याने फसवेगिरी करणाऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.
जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता अशा मौजमजा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी असलेल्या भागात किंवा लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, एम.जी. रस्ता या सारख्या उच्चभ्रू खरेदीदारांची वर्दळ असलेल्या भागात असे प्रकार सकाळी आणि सायंकाळी दिसून येतात.

लहान मूल कडेवर असलेल्या महिलेसह फूटपाथवरुन शोधक नजरेने जाणारा पुरुष अचानक सामोरा जाऊन आपण बाहेरगावचे असून पैसे हरविले आहेत. गावी जाण्यासाठी पैसे नसल्याचे सांगून मदत करण्याची विनंती करतो. त्याच्या समवेत असलेली महिलाही उदास चेहऱ्याने उभी असते. विषेशत: महिला या विनवणीमुळे १० किंवा २० रुपयांंची नोट काढून देतात. जर अधिक संपन्न दिसणाऱ्या, फुटपाथवरुन घाईने जाणाऱ्या व्यक्ती पाकिटातील ५० किंवा १०० ची नोट सुद्धा काढून देतात.

४भिक्षेकऱ्यापेक्षा चांगला वेष असलेल्या या कुटुंबांचा वावर वाढू लागला असून या पद्धतीने भावनिक आवाहन करुन पैसे उकळणाऱ्यांची बऱ्यापैकी कमाई होत
आहे. तीच ती कुटुंबे वेगवेगळ्या रस्त्यांवर अनेक वर्षांपासून आढळत असल्याचे निरीक्षण आहे.

Web Title: The common man of Gandhwandwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.