आयुक्त बदलाच्या हालचाली सुरू
By Admin | Updated: April 15, 2017 03:52 IST2017-04-15T03:52:39+5:302017-04-15T03:52:39+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासह प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.

आयुक्त बदलाच्या हालचाली सुरू
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासह प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. आयुक्त नागरिकांच्या प्रश्नांना वेळ देत नसल्याचा ठपका ठेवून त्यांची बदली करण्याच्या हालचाली सुरू आहेत. येत्या महिनाभरात ही बदली होणार आहे. त्यांच्या जागी कोणास? आणायचे याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.
भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांना पिंपरीत पाठविले होते. वाघमारे यांनी तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या कामांना चाप लावण्याचे काम केले होते. महापालिका निवडणुकीत सत्तांतर झाले आहे. राष्ट्रवादीची एकमुखी सत्ता जाऊन भाजपाची सत्ता आली आहे. आयुक्तांना पदोन्नती काही महिन्यांपूर्वीच मिळाली आहे. तसेच कौटुंबिक कारणामुळे मला मुंबईत बदली द्यावी, अशी त्यांनी शासनास विनंती केली आहे. ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत राहण्यास उत्सक नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील असल्याने लवकरच त्यांची बदली होणार आहे. (प्रतिनिधी)
तुकाराम मुंढेंना आणण्याची मागणी
पिंपरी-महापालिकेत कोणास आणायचे याबाबत स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. काम करणारा अधिकारी द्या, अशी मागणी होत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रशासनास ढिलाई दिल्याने अधिकारी मुजोर झाले आहेत, त्यामुळे त्यांना वठणीवर आणावे, तसेच पारदर्शक कारभारासाठी तुकाराम मुंढेंना महापालिकेत आणावे, असे भाजपाच्या एका गटाचे म्हणने आहे. तर मुंढेंच्या नावास भाजपातील दुसऱ्या गटाचा विरोध आहे.